दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नागरिक घरातच बंदिस्त झाले. सरकारने यात आता सूट दिली आहे. यामुळे नागरिक घराबाहेर पडले, निसर्गाच्या सान्निध्यात आस्वाद घेण्यासाठी पर्यटन स्थळात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गर्दी केली आहे. चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थान बंद आहे. परंतु, भाविकांच्या दर्शनात कमी झाली नाही. आराध्य दैवताचे दर्शन घेण्यासाठी भाविक हजेरी लावत आहेत. दारावर पूजाअर्चा करून दर्शन घेत आहेत. देवस्थान बंद असल्याने व्यावसायिकांची मात्र पंचाईत झाली आहे. त्यांचे रोजगार बुडाले असून अनेकांनी नागपूरचा मार्ग पत्करला आहे. गावात रोजगार नाही. देवस्थान परिसरात पूजेचे सामान विकून अनेक कुटुंबे उदरनिर्वाह करीत असल्याने दुकाने बंद असल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. देवस्थान सुरू करण्याची मागणी व्यावसायिक करीत आहेत. दरम्यान, देवस्थानच्या शेजारी ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळ असल्याने पर्यटक हजेरी लावत आहेत. पर्यटन स्थळाचा विकास अडगळीत आला असला तरी पर्यटकांची गर्दी कमी झालेली नाही. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिवसभर पर्यटकांनी हजेरी लावली आहे. चारचाकी वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. ठाणेदार नारायण तुरकुंडे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलीस सतीश सारवे यांनी वाहतुकीच्या कोंडीवर अंकुश घातला आहे. जलाशयाकडे जाणारे मार्ग दिवसभरासाठी बंद करण्यात आले होते. ५०० मीटर अंतरावर वाहने रोखून धरण्यात आल्याने धांदल उडाली नाही. यामुळे पर्यटकांनी पायी प्रवास करीत जलाशय गाठले होते. मोटारसायकलींच्या रांगा लागल्या होत्या. चांदपूर पर्यटन स्थळाचा जलद गतीने विकास करण्याची मागणी पर्यटक करीत होते.
बॉक्स
विश्रामगृहांचे बांधकाम प्रगतिपथावर
पर्यटन स्थळात १ कोटी ८५ लाख रुपये खर्च करून विश्रामगृहांचे बांधकाम करण्यात येत आहे. अत्याधुनिक असणाऱ्या या विश्रामगृहांत अनेक सुविधा आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या अखत्यारित विश्रामगृहांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. परंतु, जलाशय परिसरात एकाही कामाला सुरुवात करण्यात आली नाही. पर्यटन स्थळात वन विभागाची आडकाठी निकाली काढण्यात आली आहे. यामुळे विकास करताना वन विभागाची अडचण नाही. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत जलद गतीने कामांना सुरुवात करण्याची ओरड पर्यटकांत आहे. विश्रामगृहांच्या बांधकामाने पर्यटक आकर्षित होणार नाहीत. जलाशय परिसरात विकासाचा अजेंडा राबविण्याची गरज आहे. शासनाने तत्काळ निधी दिला पाहिजे, अशी मागणी आहे.
कोट
"पर्यटन स्थळाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. जलद गतीने निधी प्राप्त करण्यासाठी पर्यटनमंत्र्यांची भेट घेणार असून, पालकमंत्री यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल. या शिवाय राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत चर्चा केली जाईल. - धनेद्र तुरकर, माजी सभापती, बपेरा.