दिलीप झळके यांचे प्रतिपादन : अभियंता सप्ताहाची सांगताशहापूर : आजच्या धावपळीच्या जीवनात समाजासाठी वेळ काढणे महत्वाचे आहे. एक अभियंता म्हणून आपण समाजासाठी काय करु शकतो, याचे उदाहरण भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी सादर केले आहे. त्यामुळे प्रत्येकाने समाजासाठी झटणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप झळके यानी व्यक्त केले.शहापूर येथील मनोहरभाई इंजिनिअरिंग आॅफ टेक्नॉलॉजी सप्ताहानिमित्त मंगळवारला आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनापासून आठवडयाभर एमआयटीमध्ये अभियंता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांतर्गत तांत्रिक, बौध्दीक आणि सांस्कृतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या हस्ते झाली. अतिथी म्हणून जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. जी. पाटील, तुमसर नगर पालिकेचे मुख्य अधिकारी चंद्रशेखर गुलाणे, बी.एस.एन.एल. विभागीय अधिकारी लोकेश कटरे, प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे उपस्थित होते.प्राचार्य हरडे यांनी प्रास्ताविकातून सर विश्वेश्वरय्या यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेवून प्रत्येकाने देश हितासाठी काम केले पाहिजे. आजच्या तरुणांमध्ये देश् हितासाठी कार्य करण्याची प्रचंड इच्छा शक्ती आहे. फक्त गरज आहे. त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. त्यांना नेहमी प्रेरीत केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. सप्ताहानिमित्त प्रत्येक विभागातून विद्यार्थ्यांकरिता तांत्रिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अभियांत्रिकी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. शाहीद शेख यांनी काम पाहिले, संचालन अवंति लांजेवार व वैभव गोहरे यांनी तर आभार प्रा. योगेश शेंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
समाजासाठी झटणे महत्त्वाचे
By admin | Published: September 25, 2015 12:08 AM