दयाल भोवतेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालून १३ जणांचा बळी घेणाऱ्या सीटी १ वाघाला वन विभागाने अखेर जेरबंद केले आहे. तब्बल १० महिन्यांनंतर नरभक्षी सीटी वन वाघाला जेरबंद करताच लाखांदूर तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गत तीन आठवड्यांपासून वाघ हुलकावणी देत होता. तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रात वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले.नरभक्षी सीटी १ वाघाने मागील १० महिन्यांपूर्वी विदर्भातील भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रातील जंगलात आतंक माजविले होते. या वाघाने नियमित अंतराने ३ जिल्ह्यांतील विविध जंगल क्षेत्रातील एकूण १३ पेक्षा अधिक व्यक्तींची शिकार केली होती. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील ४, गडचिरोली जिल्ह्यातील ६ व चंद्रपूर जिल्ह्यातील ३ व्यक्तींचा समावेश आहे.नरभक्षी वाघाने शिकार केल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर वनविभागांसह नागरिकांमध्ये प्रचंड दहशत व रोष व्यक्त केला जात होता. नरभक्षी वाघाला तीन दिवसांत जेरबंद करण्याचे निर्देश मागील २ दिवसांपूर्वी शासनाने निर्गमित केले होते. १३ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती एकलपूर जंगल शिवारात नरभक्षी वाघाला डार्ट अंतर्गत बेशुद्ध करून पिंजऱ्यात कैद करण्यात आले आहे. निर्देशानुसार वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाघाला जेरबंद करण्याचे आव्हान पूर्ण करीत यश प्राप्त केल्याने नागरिकांत आनंद व्यक्त केला जात आहे.
१५ दिवसांपासून देत होता हुलकावणी- १५ दिवसांत दोन व्यक्तींची शिकार करणाऱ्या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने वनपरिक्षेत्रांतर्गत तब्बल ६० ट्रॅप कॅमेरे व ठिकठिकाणी मचाणी उभारून त्यावर शार्प शूटर तैनात केले होते. १५ दिवसांपासून वनविभाग वाघाच्या मागावर होते.
लाखांदूर तालुक्यातील चार जणांची शिकार- लाखांदूर तालुक्यातील विविध जंगलात नरभक्षी वाघाने एकूण ४ व्यक्तींची शिकार केल्याच्या घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये २७ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास दहेगाव जंगलात जलाऊ लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या स्थानिक लाखांदूर येथील प्रमोद चौधरी नामक ५४ वर्षीय इसमाची शिकार केली होती तर ४ एप्रिल रोजी इंदोरा येथील जंगलात जयपाल कुंभरे (४०) वर्षीय नामक इसमाची मोहफुल गोळा करताना शिकार केली होती. २१ सप्टेंबर रोजी विनय खगेण मंडल (४५) रा अरुणनगर नामक इसमाची मासे पकडण्यासाठी गेला असता वाघाने शिकार केली. या घटनेला आठवडा लोटत नाही तोच कन्हाळगाव शेतशिवारात मालकी शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी अन्य एका साथीदारासह गेलेल्या तेजराम कार नामक शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढवून ठार केले. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.