दयाल भोवतेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : आम्ही दोघे शेतात गेलाे. धानाची पाहणी केली. तेजरामला शेळ्यासाठी चारा तोडायचा होता. तो नाल्याच्या काठावर झाडाच्या फांद्या तोड होता. मी त्याच्या मागे काही अंतरावर उभा होतो. अचानक झुडुपातून वाघाने झेप घेतली. काही कळायच्या त्याची मान पकडली. माझे अवसान गळाले. पायाला थरथरी सुटली. तरी कसबासा झाडावर चढलो. डोळ्यासमोर वाघाने तेजरामला जबड्यात पकडून दोन नाले पार करत दीड किमी ओढत नेले. अशी आपबिती वाघाच्या हल्ल्यात ठार झालेला शेतकरी तेजराम कार यांचा सहकारी मनोज प्रधान सांगत होता.हल्लेखोर सीटी-१ वाघाने लाखांदूर तालुक्यातील कन्हळगाव शेतात तेजराम बकाराम कार (४५) या शेतकऱ्यावर हल्ला करून शुक्रवारी सकाळी १० वाजता ठार केले. या हल्लेखोर वाघाची ही १३ वी शिकार होती. सीटी-१ वाघाने कन्हळगाव येथील मनोज प्रधान यांच्या समोर हल्ला करून तेजरामला ठार मारले. हा थरार तो सांगत होता तेव्हा त्याच्या डोळ्यात भीती दिसत होती. मनोज सांगत होता, शुक्रवारी सकाळी तेजराम कार माझ्या घरी आला. शेतावर जाऊ असे म्हणाला. आम्ही सकाळी १० वाजताच्या आसपास शेतावर पोहचलो. धान पिकाची पाहणी करून घरी जाण्यासाठी निघालो. त्यावेळी तेजरामला शेळ्यांच्या चाऱ्याची आठवण झाली. तो नाल्याच्या काठावर झाडाच्या फांद्या तोडत होता. मी त्याच्या मागे उभा होतो. अचानक झुडुपातून गुरगुरत एक वाघ तेजरामच्या दिशने झेपावला. थेट त्याची मान जबड्यात पकडली. आपले अवसान गळाले. तोंडातून शब्दही फुटत नव्हेते. पाय थरथरत होते. मात्र कुठून शक्ती आली काही समजायच्या आता जवळच असलेल्या एका झाडावर चढलो. वाघने तेजरामची मान पकडून त्याला ओढत नेऊ लागला. दोन नाले पार करून वाघ दिशेनासा झाला. वाघ गेल्याची खात्री झाल्यावर आपण झाडावरून खाली उतरलो, पळतच रस्त्यावर आलो. तेथून आरडाओरड केली. मोबाईलवरून गावात माहिती दिली. गावकरी आले तेव्हा कुठे आपल्या जीवात जीव आला. पण माझा मित्र वाघाने ठार मारला असे सांगत मनोजने आपल्या डाेळ्यातून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. वाघाची दहशत दुसऱ्या दिवशीही कायम होती. परिसरातील कुणीही शेतशिवारात गेले नाही. या वाघाला आता जेरबंद करण्याएवजी ठार मारावे अशी मागणी लाखांदूर तालुक्यातील जंगल भागातील नागरिक करीत आहेत.
तर वनविभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकू- सीटी-१ वाघाचा लाखांदूर तालुक्यात धुमाकूळ सुरू आहे. आठ दिवसात दोघांचा बळी घेतला. या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात आला नाही तर वनविभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा लाखांदूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. सीटी-१ वाघाने वर्षभरात तब्बल १३ जणांचा बळी घेतला. लाखांदूर तालुक्यातील पुयार, कन्हाळगाव, चिचगाव मेंढा, इंदोरा, सोनी, दहेगाव, पिंपळगाव, मडेघाट या गावात वाघाची दहशत पसरली आहे. या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली. यावेळी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत, नगरपंचायतीचे गटनेते बबलू नागमोती, माजी नगरसेवक राकेश दिवटे, सुभाष खिलवानी, जितू सुखदेवे, अनिकेत शहारे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
वनविभागाने दिली १० लाखांची मदतसीटी-१ वाघाच्या हल्ल्यात शुक्रवारी ठार झालेला शेतकरी तेजराम कार या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना लाखांदूर वनविभागाने पुढाकार घेत शासनाकडून १० लाख रुपयांची तत्काळ मदत दिली. उपवनसंरक्षक राहुल गवई, सहायक वनसंरक्षक राठोड, लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रूपेश गावित यांनी पुढाकार घेत तेजरामच्या कुटुंबीयांना ९ लाख ८० हजार रुपयांचा धनादेश व २० हजार रुपयांची रोख रक्कम अशी १० लाख रुपयांची मदत दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख उपस्थित होते.
चारभट्टी जंगलात शीघ्र कृती दलाची चमू तैनात- तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालून १३ जणांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ वाघाला जेरबंद करण्यासाठी लाखांदूर तालुक्यातील चारभट्टी जंगलात शीघ्र कृती दलाची चमू तैनात करण्यात आली आहे. त्यात सहा शार्प शूटर असून वाघ दिसताच त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन मारण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जंगलात ठिकठिकाणी २५ टॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. मचाणावरून शीघ्र कृती दलाचे पथक खडा पहारा देत असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे. उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक रोशन राठोड व लाखांदूरचे वन परिक्षेत्राधिकारी रूपेश गावित यांच्या नेतृत्वात पथक वाघाचा शोध घेत आहेत.