ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाचे खरे कारण शोधण्यासाठी नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने आठवडा उलटल्यावरही आपला अहवाल सादर केलेला नाही. तो नेमका कधी सादर होणार, हे देखील स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे प्रशासनाला घटनेतील दोषी सापडेनासे झाले आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे.
भंडारा अग्निकांडाला शनिवारी आठ दिवस पूर्ण होत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घटनेदिवशीच भंडाऱ्यात येऊन उच्चस्तरीय समितीची घोषणा केली. तीन दिवसात ही समिती अहवाल देईल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. समितीच्या अध्यक्षाची उचलबांगडी करून विभागीय आयुक्त संजीवकुमार यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तेव्हा दोन-तीन दिवसातच दोषींवर कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप या समितीचा अहवाल सादर झाला नाही. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी रविवारपर्यंत समिती अहवाल देईल, असे सांगितले. त्यामुळे सर्वांच्या नजरा अहवालाकडे लागल्या आहेत. भंडारा पोलीस ठाण्यात तूर्तास दहा बालकांच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर पोलीस कारवाईची दिशा निश्चित होईल. अहवाल येत नाही तोपर्यंत ही घटना आणि घटनेला कोण जबाबदार आहे, हे कळायला मार्ग नाही.
समितीकडून प्रात्यक्षिकासह चौकशीn चौकशी समितीने १२ जानेवारी रोजी दिवसभर तळ ठोकून कसून चौकशी केली. अग्निशमन कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, गार्ड यांच्याकडून या घटनेचे प्रात्यक्षिक करवून घेतले. n या पथकात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रामास्वामी एम., महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसचे संचालक प्रभात रहांगडाले, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे तसेच आरोग्य सेवा उपसंचालक संजय जयस्वाल यांचा समावेश होता.