आॅनलाईन लोकमतभंडारा : कोणत्याही विषयात पारंगत असो परंतु आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून आपला विषय हा मराठीच आहे. माय आपल्याला घडविते, संस्कारित करते ती माय मराठी आहे. लहानपणी आईच संगोपन व पोषण करते म्हणून त्या आईचे संगोपन व पोषणाची जबाबदारी आपलीच आहे. आजच्या पिढीचा कल इंग्रजी शब्दांकडे आहे. मराठी भाषा बोलण्याची लाज वाटते, हे संकुचितपणाचे लक्षण आहे. एक भाषा नष्ट झाली तर एक संस्कृती नष्ट होते याचे भान आपण ठेवायला पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्यात कवि डॉ.श्याम धोंड यांनी केले.जे.एम. पटेल महाविद्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रजांचा जन्मदिवस राजभाषा मराठी गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जे.एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे होते. यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा.सुमंत देशपांडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे सुनीलदत्त जांभुळे उपस्थित होते. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..... जगात माय मानतो मराठी’ अशी काव्यांजली अर्पण करुन डॉ.श्याम धोंड यांनी भाषणास सुरुवात केली. मराठीच्या विविध छंटांवर प्रकाश टाकताना ते म्हणाले, विविध भाषांच्या अतिक्रमणामुळे भाषा कमजोर होते. यावर वि.दा. सावरकरांनी भाषा शुध्दीचे काम करुन इंग्रजीचे प्रतिशध्द जसे प्राध्यापक, प्रपाठक, प्राचार्य, स्वाक्षरी, टपाल, आगगाडी मराठीला दिले. मराठीला समृध्द वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी तुरुंगसाहित्य या वाङमयाची मराठीत भर घातली. अशा मराठी भाषेचा आपणास अभिमान वाटला पाहिजे. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेत विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देण्यात आले. काव्यवाचन - स्पर्धेत गणेश खडसे प्रथम, सुषुप्ती काळबांधे द्वितीय तर स्वाती करमरकर तृतीय ठरल्या. कथाकथन स्पर्धेत गणेश खडसे प्रथम, गायत्रीदेवी हिरापुरे द्वितीय तर तृतीय सुषुप्ती काळबांधे. निबंध स्पर्धोत तितिक्षा रंगारी प्रथम, हर्षदा शिवणकर द्वितीय तर प्रविण सोनकुसरे तृतीय ठरला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या मार्च २०१७ च्या एम.ए. मराठी विषयात भीमाताई भोयर ही विद्यार्थींनी प्रथम आली. तिला ना.के. बेहरे स्मृती सुवर्णपदक प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.ढोमणे म्हणाले, राष्ट्रसंतांनी ग्रामगितेतून मराठी भाषेचा विकास व प्रसार केला आहे. आज त्यांचेच नाव विद्यापिठाला मिळाले आहे. मॉरिशस येथील बहुतांश लोकांची भाषासुध्दा मराठी आहे. जागतिक स्तरावर ही भाषा बोलली जाणे हे गौरवास्पद आहे. मराठी ही समृध्द भाषा आहे. मराठीची लिपी देवनागरी असून मराठीचा गोडवा मोठा आहे. म्हणून कितीही उच्चशिक्षीत झाले तरी मातृभाषा विसरु नका, अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रास्ताविकातून प्रा. सुमंत देशपांडे यांनी, राजभाषेची जडणघडण व विकासाच्या बाबतीत कुसुमाग्रजांचे मोठे योगदान आहे. राजभाषेला चागले दिवस यावेत हा उद्देश त्यांचा होता. ज्ञानेश्वर ते सुरेश भट यांच्यासारखी परंपरा मराठी भाषेला लाभली आहे. फादर स्टिफन यांनी सुध्दा ख्रिस्तपुराणात मराठीचा गौरव केला आहे. संचालन सुषुप्ती काळबांधे व ममता राऊत यांनी तर आभार गायत्रीदेवी हिरापूरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. कार्तिक पन्नीकर, प्रा. विणी ढोमणे, प्राध्यापक, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते.
एक भाषा नष्ट झाली तर एक संस्कृती नष्ट होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:07 PM
कोणत्याही विषयात पारंगत असो परंतु आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून आपला विषय हा मराठीच आहे. माय आपल्याला घडविते, संस्कारित करते ती माय मराठी आहे.
ठळक मुद्देश्याम धोंड : राजभाषा मराठी गौरव दिन उत्साहात साजरा