भंडारा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यानंतरही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाही. आता जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी घोषित केलेल्या प्रतिबंधित आदेशाने कामाव्यतिरिक्त कुणालाही बाहेर येता येणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता इतरसर्व आस्थापना पूर्णत: बंद राहणार आहे. सहकारी पत संस्था, खाजगी बँक, वीज कार्यालय, दूरसंचार सेवा विमा कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मुभा दिलेली कार्यालय वगळता सर्व खाजगी कार्यालय बंद राहणार आहे.
हॉटेलच्या परिसराच्या आतील व अंतर्गत भागातील उपहारगृहे वगळून सर्व उपहारगृहे बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत पार्सल सुविधा देण्याची परवानगी राहणार आहे. घरपोच सेवा देणाऱ्यांना कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. धार्मिक स्थळे, उपासना स्थळे तसेच हेअर सलून बंद राहणार आहे. शाळा महाविद्यालय बंद राहतील. सर्व खाजगी शिकवणी वर्गही बंद राहणार आहे. लग्न सोहळ्यासाठी २५ जणांना परवानगी राहणार असून अंत्यविधीसाठी २० जणांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.