कोरोना काळात लॉकडाऊन व संचारबंदीचा अनुभव प्रत्येकानेच अनुभवला. अशातच गत काही दिवसात दुकाने बंद करण्याच्या वेळा वारंवार बदलत गेल्या. याच कालावधीत भंडारा शहरातील एका कापड दुकानात घडलेला किस्सा शहरात चांगलाच रंगला. दुकान बंद करण्याची वेळ झाली असताना आठ ते दहा ग्राहक कापड दुकानात होते. एकीकडे दुकान बंद करावी व दुसरीकडे ग्राहकांना खाली हाताने कसे पाठवावे, असा सवाल मनात उपस्थित करून दुकान मालकाने दुकानाचे शटर लावून घेतले. दुकानाच्या आत ग्राहक बसले असल्याची कुजबुज पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली. सायंकाळपर्यंत
दुकानाच्या समोर कर्मचारी ठाण मांडून बसले होते. पण शटर काही उघडले नाही. दुकान मालकाची शक्कल कामी आली. त्याने एकेक करून ग्राहक मागील दाराने पळवून लावले. दंड वाचविला आणि ग्राहकांचेही समाधान झाले. पण, दुसरीकडे पालिकेचे कर्मचारी रिकाम्या हाताने परतले.