तालुक्यातील विरली (बुज.) येथे घटनेतील पीडित राजू मेश्राम कुटुंबासह एका झोपडीत वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री त्यांची पत्नी स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटवायला गेली असता, अचानक भडका उडाला. काही कळायच्या आता झोपडीला आग लागली. कुटुंबातील सदस्यांनी झोपडीबाहेर पळ काढला.
दरम्यान, सदरची आग घरालगतच्या हेमराज विष्णू बेदरे नामक युवकाच्या लक्षात येताच, सबंधित युवकाने धैर्य दाखवत, पेटत्या झोपडीत प्रवेश करून सिलिंडर झोपडीबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच, लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल कोकाटे, पोलस अंमलदार रजय चुटे, भूपेश बावनकुळे आदींनी घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत संसारोपयोगी साहित्यासह इतर साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती आहे.