लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : वाटमारीच्या घटनेची शाई वाळत नाही तोच गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास साकोली शहरातील दोन सराफा दुकानांसह दूध डेअरीत चोरी झाली. चोरट्यांनी पाच लाख रुपयांच्या मुद्देमालासह सहा बुलेट आणि पिस्तूल चोरून नेली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा माग काढणे सुरू केले. साकोली येथील राष्ट्रीय महामार्गावर एकोडी फाट्यावर रुपेश खेडीकर यांचे खेडीकर ज्वेलर्स आणि पंचशील वॉर्डात राजेश शहाणे यांचे पुष्पम ज्वेलर्स आहे. शुक्रवारी सकाळी दोन्ही सराफा दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती तत्काळ साकोली पोलिसांना देण्यात आली. चोरट्यांनी खेडीकर ज्वेलर्समधून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. एवढेच नाही तर स्वसंरक्षणार्थ खेडीकर यांच्याकडे असलेली परवानाप्राप्त पिस्तूल आणि त्याच्या सहा बुलेट चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले. पुष्पम ज्वेलर्समधून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. पोलिसांनी याठिकाणी चौकशी सुरू केली. सायंकाळपर्यंत नेमके किती सोने आणि चांदी चोरीस गेली होती याची माहिती कळू शकली नाही. यासोबतच चाेरट्यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर असलेल्या सुमन डेअरीतही चोरी केली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या मालकीच्या या डेअरीतून चोरट्यांनी २२ हजार रुपयांचा मुद्देमाल नेला. या घटनेने साकोली शहरात एकच खळबळ उडाली. पिस्तूल चोरीने वाढली चिंता सराफा दुकानातून परवानाप्राप्त पिस्तूल आणि सहा बुलेट चोरीस गेल्याने चिंता वाढली आहे. या पिस्तूलच्या आधारे दुसरा एखादा दरोडा टाकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात चोरीचा तपास सुरू आहे.
सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरला- चोरट्यांनी खेडीकर ज्वेलर्सचे शटर तोडून आत प्रवेश केला. आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येण्याची शक्यता असल्याने चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला. मात्र या ज्वेलर्सजवळ असलेल्या विदर्भ सहकार निधी लिमिटेड बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे तोंडाला रुमाल बांधून बँक व एटीएमसमोर संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. खेडीकर ज्वेलर्सच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन आरोपी दिसत आहेत. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या सहायाने आरोपींचा शोध घेत आहेत.