२० लोक ०२ के
लाखांदूर : गत दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण असताना १९ मार्च रोजी रात्रीदरम्यान अचानक झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यात कापणी झालेल्या शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुकसान झालेल्या पिकांत हरभरा व गहू या पिकांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
गत खरीप हंगामात तालुक्यात जवळपास २८४२ हेक्टर क्षेत्रात हरभरा तर १४४९ हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची लागवड करण्यात आली होती. या लागवडीनुसार तालुक्यातील अधिकत्तम क्षेत्रातील पिकांची काढणी व मळणीदेखील आटोपली आहे. मात्र काही प्रमाणातील गहू व हरभरा पिकांची काढणी सुरू असताना तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन शुक्रवारी रात्रीदरम्यान जोरदार पाऊस बरसला. या पावसाने शेतात काढणी झालेले हरभरा व गहू पीक पावसात भिजल्याने या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तथापि काही शेतकऱ्यांनी पावसापासून पिकांच्या बचावासाठी शेतात साठवणूक केलेल्या पिकांवर ताडपत्री घातल्याचे दिसून येत असले तरी पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने संबंधित पिकांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदाच्या खरिपात धान उत्पादनात घट येऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असल्याचे बोलले जात असतानाच कडधान्य पिकांवरदेखील पावसाचा प्रकोप झाल्याने शेतकरी अधिकच संकटात सापडल्याचे बोलले जात आहे.