चिचाळ (भंडारा) : घरी पोळ्या तयार करत असलेल्या आजीची नातवाने साडी ओढल्याच्या कारणावरून झालेल्या वादात सुनेने सासूला काठीने बेदम मारहाण केली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील चिखली येथे गुरुवारी सकाळी घडली. यात सासू गंभीर जखमी झाली असून, सुनेवर अड्याळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताराबाई हरिश्चंद्र सोनटक्के (६०, रा. चिखली) असे जखमी सासूचे नाव आहे, तर दीपाली शेषराव सोनटक्के (३१) असे आरोपी सुनेचे नाव आहे. सासू ताराबाई गुरुवारी सकाळी घरी पोळ्या तयार करीत होती. त्यावेळी नातू साडी ओढत होता. तेवढ्यात सून दीपाली तेथे आली. साडी ओढण्यावरून दोघींमध्ये वाद सुरू झाला. त्यावेळी दीपालीने दाराजवळ ठेवलेली लाकडी काठी हातात घेऊन शिवीगाळ सुरू केली.
काही कळायच्या आता दीपालीने सासूवर काठीने हल्ला केला. त्यात सासूचे दोन्ही हात, पाय, कमरेवर आणि मनगटाला जबर दुखापत झाली. सासू ताराबाईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्या बयाणावरून आणि वैद्यकीय अहवालावरून अड्याळ ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार गंगाधर आडे तपास करीत आहे.