लाखनीतील प्रकार : श्रावणबाळ योजनेतील शासकीय पैशाचा अपहार चंदन मोटघरे लाखनीकेंद्र शासन व राज्य शासनाच्या अनुदानातून तहसील कार्यालयामार्फत इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, विकलांग योजना, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनाद्वारे गरीब लाभार्थ्यांना आर्थिक मदत दिल्या जाते. मात्र तालुक्यात लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही मृतकाच्या नावावर आलेले अनुदानाचा अपहार होत असल्याचे समोर आले आहे.तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे ३०७१, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेची ५४६६, श्रावणबाळ सेवा योजनांची ८९५६, विकलांक योजना ३५, विधवा योजनेचे २५ लाभार्थी आहेत. सदर लाभार्थ्यांना देण्यासाठी कोट्यवधी रुपयाचे शासनाकडून देण्यात येते. वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थ्यांचे निधन झाल्यानंतर शासकीय रेकॉर्डवरून नाव न रद्द केल्यामुळे अनुदान बँक खात्यावर जमा होत असते. मृतक लाभार्थ्यांचे अनुदान वारसदाराकडून शासनाची फसवणूक करून पैसे काढले जातात. श्रावणबाळ योजनेचे अनुदानाचे लाभार्थी भागरथा गोविंदा पेटकर यांचा दि. ४.१०.२०१५ ला मृत्यू झाला. तरी तिचे २३ आॅक्टोबर २०१५ ला अनुदान उचलण्यात आले आहे. कवलेवाडा येथील ८, मेंगापूर ६, मऱ्हेगाव ८, ढिवरखेडा १, वाकल १९, पाथरी ११ याप्रमाणे पालांदूर (चौ.) परिसरात लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नावाचे अनुदान बँकेतून लाटणारे सक्रीय दलाल तालुक्यात आहेत. लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तलाठ्यांनी लाभार्थ्यांचे नाव यादीतून कमी करायला पाहिजे. परंतु तलाठ्यांच्या निष्काळजीपणा व दुर्लक्षीतपणामुळे मृतक लाभार्थ्यांचे नावावरील अनुदानाची राजरोसपणे उचल केली जाते.दरवर्षी तहसील कार्यालयात मार्च महिन्यात लाभार्थी जिवंत असल्याचा दाखला देत असतात. तरीही दर महिन्याला अनुदान स्वीकारताना ग्रामपंचायतच्या जिवंत असल्याचा दाखला दाखविणे सक्तीचे केल्यास अनुदानाचा गैरवापर होणार नाही.शासनाने वृद्धापकाळ योजनेद्वारे वंचित व निराधार वृद्धांना आर्थिक सहकार्य करीत असते. अनेक लाभार्थ्यांचे कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरी करीत असतात. अशा लाभार्थ्यांना अनुदानपात्र ठरविले जात आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम लाभार्थी व मृतक लाभार्थ्यांचे नाव यादीतून कमी केल्यास शासकीय अनुदानाची बचत होईल व खऱ्या पात्र लाभार्थ्यांना अनुदान देता येईल.श्रावणबाळ सेवा योजना, संजय गांधी निराधार व वृद्धापकाळ योजनेच्या मृतक लाभार्थ्यांची नावे यादीतून कमी केले आहे व तलाठ्यांना सूचना दिलेल्या आहेत. लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तात्काळ नाव कमी करून अनुदान रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.- डी.सी. बोंबर्डे, तहसीलदार, लाखनी.निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या मृतक लाभार्थ्यांच्या नावावर जमा झालेली रक्कम बँक खात्यातून समाजकंटक लाटत आहे. मृतक लाभार्थ्यांची यादी तहसीलदारांना दाखविली आहे. पालांदूर परिसरातील मृत्यू पावलेल्या लाभार्थ्यांच्या नावावरील अनुदान उचलणारी टोळी सक्रीय आहे. यावर पायबंद घातला पाहिजे.- दिलवर रामटेके, माजी सभापती, लाखनी.
मृत लाभार्थ्यांचे अनुदान उचलले
By admin | Published: November 30, 2015 12:44 AM