भंडारा : जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरती प्रक्रियेला गत चार वर्षांपासून टाळाटाळ केली जात असून वारंवार आंदोलने करूनही उपयोग होत नाही. त्यामुळे आता बुधवार ३० जूनपासून येथील जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा अनुकंपाधारकांनी दिला आहे.
२०१८ पासून जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांची भरती घेतली नाही. त्यामुळे अनुकंपाधारक काही महिन्यांतच वयाची ४५ ही मर्यादा ओलांडणार आहेत. त्यामुळे अनुकंपाधारक अस्वस्थ झाले आहेत. ३० जुलै २०२० च्या आणि ५ फेब्रुवारी २०२० च्या शासन निर्णयानुसार ४५ दिवसांच्या आत अनुकंपा भरती पूर्ण करणे आवश्यक आहे. शासनाचा आदेश असताना जिल्हा परिषद मात्र टाळाटाळ करीत आहे. विशेष म्हणजे राज्यातील इतर जिल्हा परिषदांमध्ये नोकरभरती झाली. परंतु गत १५ वर्षांपासून अनेक अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. १८ जानेवारी रोजी धरणे आंदोलन, ३० मार्च ते १० एप्रिलपर्यंत साखळी उपोषण करण्यात आले. परंतु कुणीही दखल घेतली नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ आश्वासने देत आहेत. कोरोना संकटात या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून आता त्यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. सदर निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्या वेळी विद्याधर कुंभरे, उमेश डांगरकर, अश्विन जांभुळकर आदींसह अनुकंपाधारक उपस्थित होते.