भंडारा: लगतच्या जिल्ह्यात जनावरे विक्रीसाठी नेऊन दुपारच्या सुमारास मेटॅडोरने स्वगावी परत येताना वाटेतच भोवळ येऊन संतोष विठ्ठल नहाले (४०) नामक लाखांदूर येथील व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाला. ही घटना रविवारी २६ मे रोजी दुपारी ११ वाजताच्या सुमारास सावंगी गावाजवळ घडली. पोलिस सुत्रानुसार, संतोष नहाले हे रविवारी सकाळच्या सुमारास जनावरे विक्री करण्यासाठी लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे मेटॅडोर (एम एच ३६ एफ १८२६) ने गेले होते. जनावरे ब्रम्हपुरी येथे सोडून मेटॅडोरने लाखांदूरला परत येत असतानाच सावंगी गावाजवळ संतोषला प्रवासातच अस्वस्थ वाटू लागले व भोवळ आली.
त्यांची प्रकृती लक्षात घेता मेटॅडोरमधील अन्य नागरिकांनी सावंगी येथील अन्य चालकाला पाचारण करून उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान संतोषचा मृत्यू झाला. लाखांदूरचे पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर आगशे, नायक सुभाष शहारे, वाहन चालक पोलिस हवालदार, रविंद्र मडावी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पुढील तपास पोलिस हवालदार कोसरे करीत आहेत. संतोषने मद्य प्राशन केले होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.