गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : तुमसर तालुक्यातील खंदाड या गावातील एका शेतामध्ये वाघ मृतावस्थेत आढळलेल्या वाघाच्यामृत्यूवरील पडदा आता हळूहळू सरकत आहे. संबंधित शेतकरी रतनलाल वाघमारे यांच्या घरी वन विभागाने शोध घेतला असता विजेचे वायर आणि ते पसरविण्यासाठी काठ्या आढळल्या. यावरून त्या वाघाचा मृत्यू विजेच्या सापळ्यात अडकूनच झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी आणि वन विभागाने व्यक्त केला आहे. या शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
तुमसरवरून २८ किलोमीटर अंतरावरील वन परीक्षेत्रालगतच्या धानाच्या शेतीमध्ये बुधवारी (१६ ऑगस्ट) सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास मोठा वाघ मृतावस्थेत आणि संशयास्पद रित्या झालडांच्या फांद्यांनी झाकून ठेवलेला आढळला होता. गावचे पोलिस पाटील कमलेश भारद्वार यांनी बुधवारी सकाळी गावातील चर्चेनंतर वनरक्षक वासनिक यांना याबद्दल कल्पना दिली. नंतर यांचे सोबत शेतात पोचल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी शोध घेतला असता धानाच्या एका शेतामध्ये झाडांच्या फांद्यांनी झाकून ठेवलेला वाघाचा मृतदेह आढळला. या वाघाचा मृत्यू किमान सात दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. मृत वाघाचे शवविच्छेदन आणि अन्य प्रक्रिया सुरू आहे.
धानाच्या शेतीमध्ये मृतावस्थेत आढळला वाघ, प्रेत होते कुजलेले, एकच खळबळ
वाघ की वाघिण, अस्पष्टच
वाघाचा मृतदेह कुजलेला असल्याने वाघ नर की मादी हे स्पष्ट होऊ शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच काय ते कळणार आहे. घटनास्थळीच शवविच्छेदन करून चिचोली डेपोममध्ये अंत्यविधी करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. शेतकऱ्याकडून उडवाउडवीची उत्तरे
वन विभागाच्या पथकाने आणि पोलिसांनी संबंधित शेतकरी रतनलाल वाघमारे याच्याकडे विचारणा केली असता, तीन दिवसांपूर्वी या मृत वाघाला झाडाच्या फांद्यांनी झाकून ठेवल्याची कबुली दिली. आपल्या शेतात वाघ मरून पडलेला दिसला. भीतीपोटी आपण त्याला झाकून ठेवल्याचे त्याने सुरूवातीला सांगितले होते. मात्र घटनास्थळावरील परिस्थितीवरून या वाघाची शिकार झाल्याचा संशय वन विभागाला आला होता.