येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारच्या पहाटे घडलेल्या अग्निकांडात दहा निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेला. या घटनेची पाहणी करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे बुधवारी सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात आगमन झाले. सर्वप्रथम वाचलेल्या बालकांच्या कक्षात जाऊन राज्यपाल कोश्यारी यांनी शिशुंच्या मातांसोबत संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाई चौकशी केली. बालक व मातांची योग्य काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर दुर्घटनाग्रस्त एसएनसीयु कक्षाला भेट देऊन पाहणी केली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी या घटनेत मृत पावलेल्या प्रत्येक बालकाच्या कुटुंबियांना स्वेच्छा निधीतून दोन लाख रुपये मदत देण्याची सूचना दिली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव उपस्थित होते. तत्पूर्वी राज्यपालांचे विश्रामगृहावर आगमन झाले. त्यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्याकडून रुग्णालयातील आगीच्या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती घेतली. विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांना भेटून घटनेसंदर्भात निवेदन दिले.