हेमराज परसराम मारबते (वय ६०, रा. देव्हाडा, ता. तुमसर) असे मृत कामगाराचे नाव आहे. देव्हाडा येथे एलोरा पेपर मिल असून, येथील कामगारांनी ९ ऑगस्टपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी सकाळी ११.३० सुमारास हेमराज मारबते आंदोलनस्थळी आले. तेथे त्यांना अचानक भोवळ आली. त्यामुळे त्यांना इतर कामगारांनी तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पठविण्यात आले. भंडारा येथे मंगळवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हेमराज पुढील महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. या घटनेने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
एलोरा पेपर मिलच्या कामगारांत तीव्र असंतोष असून, कारखाना प्रशासनाविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे. मागील ९ ऑगस्टपासून येथील कामगार धरणे आंदोलन करीत आहेत. परंतु प्रशासनाच्या कोणताही अधिकारी याकडे फिरकला नाही, हे विशेष.