उसर्रा : रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा अखेर उपचारादरम्यान नागपूर येथे शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. १८ फेब्रुवारी राेजी रानडुकराच्या हल्ल्यात ताे दुचाकीने जात असताना राज्य मार्गावर गंभीर जखमी झाला हाेता. महिनाभर त्याने मृत्यूशी झुंज दिली.
राेशन पाण्डुरंग अटराये (३२) असे मृताचे नाव आहे. ताे उसर्रा येथून १८ फेब्रुवारी राेजी दुचाकीने तुमसरकडे जात हाेता. त्यावेळी त्याच्यासाेबत खेमचंद देवचंद दमाहे हा तरुण हाेता. तुमसर - रामटेक राज्य मार्गावर उसर्रा शिवारात अचानक रानडुकर दुचाकीच्या आडवे आले. यात दुचाकी अनियंत्रित हाेवून रस्त्याच्या कडेला काेसळली. त्यात दाेघेही गंभीर जखमी झाले. राेशन अटराये याला नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिन्याभर मृत्यूशी झुंज दिल्यावर शनिवार २० मार्च राेजी सायंकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात हाेताच प्रत्येकजण हळहळत हाेता. राेशनच्या मागे पत्नी, दाेन मुले असा परिवार आहे.
उसर्रा परिसरात रानडुकरांचा माेठा सुळसुळाट झाला असून शेतशिवारात रानडुकरांचा माेठा धुमाकूळ सुरु असताे. आता राज्य मार्गावरही रानडुकरांचा संचार वाढला असून असे अपघात हाेत आहे.