- देवानंद नंदेश्वर
भंडारा : धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना घडाईपेक्षा मडाईच जास्त करावी लागत आहे. परिणामी धानाची शेती बेभरवशाची झाली आहे. सततच्या नापिकीमुळे व वाढत्या कर्जामुळे जिल्ह्यात ६९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यापैकी ४०५ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर जिल्हा प्रशासनाने अपात्रतेचा ठपका ठेऊन त्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवले. विधवांचे कुंकू हरपले तरीही शासनाकडून बळीराजाची फरफट सुरू आहे.
शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असून, आतापर्यंत जिल्ह्यात ६९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी एकूण २७६ जणांच्या कुटुंबीयांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. २८६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. भंडारा जिल्हा धान उत्पादकांचा म्हणून ओळखला जातो. धान उत्पादक शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी इतर कोणत्याही पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बहुतेक येत नाहीत.
कधी पाऊस न आल्याने, तर कधी अधिकचा आल्याने हा शेतकरी संकटात सापडतो. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी उत्पन्न चांगले होणे गरजेचे आहे. नापिकी होऊन उत्पन्नात घट झाल्यास नुकसान होते व कर्ज फेडताना तारेवरची कसरत करावी लागते. अशा वेळी कर्जबाजारी शेतकऱ्यांपुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसतो. अशाच कर्जामुळे खचून गेलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत.
२००३ पासून २०२३च्या ऑक्टोबरपर्यंत ६९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. २००६, २००७, २००८, २०१५ व १६ मध्ये ५० च्या आसपास शेतकऱ्यांनी स्वत:ची जीवनयात्रा संपविली. २०११ मध्ये ४४ शेतकरी आत्महत्येच्या मार्गाने गेले, तर २०१२ मध्ये १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आतापर्यंत २ कोटी ७६ लाख रुपयांची मदत शेतकरी कुटुंबीयांना देण्यात आली.