राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांसह गत तीन वर्षांपासून थकित कर्जदार शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. राज्यातील थकित कर्जदार शेतकऱ्यांसह तालुल्यातील हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतानाच शासनाने नियमित कर्जाची उचल करून विहित मुदतीत भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याचे अस्वस्थ केले होते. शासनाकडून प्रारंभी कर्जमुक्ती योजनेची यशस्वी अंमलबजावणी होताना प्रोत्साहन निधीसाठी पात्र शेतकऱ्यांनी काही काळ तग धरल्याचे दिसून येत होते. मात्र नियमित कर्जाची उचल व विहित मुदतीत भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधीच्या लाभाची आस लागल्याचे दिसून येत आहे.
लाॅकडाऊनच्या काळात कामाविना आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात नवीन पीक कर्ज घेऊन कशीबशी शेती केली खरी. मात्र पूरपरिस्थिती व कीड रोगाच्या प्रादुर्भावाने प्रभावित या भागातील शेतकरी पुरता हतबल दिसत आहे. कर्जमुक्ती झाली, प्रोत्साहन निधीचे काय? असा आर्त सवाल करताना दिसत आहे.