पवनी : राष्ट्रीयकृत बँका व पतसंस्था यांचेकडून कर्ज घेऊन भागत नसल्यामुळे शेतकरी सोने तारण ठेऊन सावकारांकडून कर्ज घेतो. पवनी तालुक्यातील १,२०० हून अधिक शेतकऱ्यांनी सावकारांकडे सोने तारण ठेऊन कर्ज घेतले. शासनाने कर्ज मुक्तीचा निर्णय घेतला परंतू परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांना दिलेल्या नमुना ८ च्या पावत्या त्यांच्या खतावणीवर नोंदविल्या नाही. त्यामुळे शेतकरी कर्जमुक्तीच्या योजनेपासून वंचित राहिला आहे. पवनी तालुक्यात परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांकडून सोने तारण ठेऊन कर्ज दिले. नियमानुसार त्यांना नमुना ८ च्या पावत्या दिल्या परंतू त्या पावत्यांची नोंद त्यांच्या खतावणीवर घेतलेली नाही. खतावणीवर नोंदीशिवाय सहायक निबंधकाकडे माहिती दिली जात नाही व ती शासनापर्यंत पोहचत नाही. खतावणीवर नोंद नसल्यामुळे सोने तारण ठेऊन सावकाराकडून कर्ज घेतलेले शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहे. या आशयाचे निवेदन सावकारी कर्ज मुक्ती संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी वंचित शेतकऱ्यांचे स्वाक्षरीनिशी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकार खात्याचे प्रधान सचिव यांचेकडे निवेदन पाठविले आहे. नमुना ८ ची खतावणी न करणारे सावकारावर योग्य कारवाई करून कर्जमुक्तीपासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. (तालुका प्रतिनिधी)
सावकाराकडून कर्जधारक शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित
By admin | Published: November 29, 2015 1:33 AM