चुल्हाड : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सिहोरा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा व फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत असलेल्या पोलिसांना सोनेगावच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. सोमनाथ लक्ष्मण उके (२४) रा. पैकाटोला जि. गोंदिया असे मृतदेह सापडलेल्या आरोपीचे नाव आहे. पिपरी (चुन्नी) येथील कल्पना मेश्राम या मुलीचे मार्च २०१६ मध्ये पैकाटोला येथील सोमनाथ उके याच्याशी लग्न झाले. पती सोमनाथने कल्पनाचा छळ करण्यासाठी सुरूवात केली. मे महिन्यात ते दोघेही पिपरीचुन्नी येथे आले. २९ मेच्या पहाटे पती-पत्नीत भांडण झाले. भांडणाला कंटाळून कल्पनाने विषप्राशन केले. सोमनाथने विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांना तुमसर रूग्णालयात नंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. प्रकृती बरी वाटू लागताच सोमनाथ तुमसरच्या रूग्णालयातून पसार झाला. अंत्यविधीसाठी कल्पनाचा मृतदेह पैकाटोला येथे सासरी नेण्यात आले. झाडावर बसुन पत्नीचा अंत्यविधी तो पाहत होता. काही लोकांना सोमनाथ झाडावर दिसताच त्याला पकडण्यात आले. त्यानंतर सिहोरा पोलिसांनी सोमनाथला ३० मे रोजी ठाण्यात आणले. हुंड्यासाठी पत्नीचा छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोमनाथला ताब्यात घेऊन दुसऱ्या दिवशी सोडले. त्याच दिवशी सायंकाळी कल्पनाच्या आईने तक्रार दिली. याप्रकरणी सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पूर्वी सोमनाथ पोलीस ठाण्यातून गेला होता. पोलिसांनी १ जूनपासून नागपूर, गोंदिया या ठिकाणी सोमनाथचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान १९ जूनला सोनेगावच्या घनदाट जंगलात मृतदेह असल्याचे सांगितले. मृतकाच्या खिशात आधार कार्डवरून सोमनाथचा मृतदेह असल्याची खात्री पटली. (वार्ताहर)
फरार आरोपीचा मृतदेहच गवसला
By admin | Published: June 22, 2016 12:25 AM