प्रकरण मूर्ती विटंबनेचे : मुख्य आरोपी मोकाटच, तुमसर पोलिसांचे अपयश तुमसर : देव्हाडी येथील हनुमान मंदिर मूर्ती तोडफोड प्रकरणी २५ दिवस लोटल्यावरही मुख्य आरोपींचा शोध लावण्यात पोलीस प्रशसनाला अपयश आले. रविवारी मंदिर समितीने आमसभा बोलविली होती. १३ जुलै रोजी मुळ घरमालक मंदिर परिसराबाबत निर्णय देणार आहे. सुमारे चार तास आमसभा चालली. मात्र आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करण्यात आले, परंतु तोडगा निघाला नाही.देव्हाडी येथील नेहरु, वॉर्डात पूरातन हनुमान मंदिरातील १३ जून रोजी मुर्ती तोडफोड करण्यात आली होती. विरोध म्हणून गोंदिया- तुमसर मार्ग रोखून निषेध व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात चार संशयितांना अटक करण्यात आली. नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. याप्रकरणात अजूनपर्यंत मुख्य आरोपी मोकाटच आहे. पोलीस प्रशासनाला येथे यश आले नाही.रविवारी मंदिर समितीने मंदिराजवळ आमसभा बोलविली हाती. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, जिल्हा परिषद सदस्य के. के. पंचबुध्दे, पंचायत समिती सदस्य अशोक बन्सोड, ग्रामपंचायत सदस्य संजय बिरणवारे, मंदिर समितीचे सदस्य मनोज चौबे, बंटी नेवारे, आलमखान, ए. डी. खान, माजी सरपंच सुशिल बन्सोडसह शेकडो नागरिक उपस्थित होते. तंटामुक्ती अध्यक्ष शिवप्रसाद लिल्हारे उपस्थित होते.मंदिर परिसरातील घरमालक प्रेमप्रकाश नेवले यांनी मंदिरातील मुर्ती तोडफोड केल्याचे संभाषणाची ध्वनिफित यावेळी उपस्थिताना ऐकविण्यात आली. त्यावेळी सभेत तणाव निर्माण झाला. जुने घरमालक अंकुश येळणे नागपूर व त्यांचे कुटंूबियांनी मंदिर, वडाचे झाडाची रजिस्ट्री करुन दिली नाही अशी माहिती उपस्थितांना दिली. राजेंद्र पटले यांनी संबंधित घरमालकास अटक करण्याची मागणी यावेळी केली. १३ जुलै रोजी घरमालक नेवले मंदिर व परिसरातील जागेचा निर्णय देणार आहेत. शेवटी १३ जुलैपर्यंत थांबण्याचा निर्णय आमसभेत होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
१३ रोजी होणार मंदिराचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2016 12:30 AM