भंडारा : गावाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील वातावरण आता तापायला लागले आहे. १४८ ग्रामपंचायतीच्या १०५२ सदस्यांसाठी निवडणूक हाेत असून छाननीनंतर ३११८ नामांकन कायम राहिलेत. ४ जानेवारी ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख असून उमेदवारी मागे घेण्यासाठी गावागावांत आता मनधरणी सुरू असल्याचे चित्र आहे. काही ग्रामपंचायतीनी अविराेधसाठी प्रयत्न चालविले आहेत. या निवडणुकीचे खरे चित्र नामांकन मागे घेण्याच्या दिवसानंतरच स्पष्ट हाेणार आहे.
नवीन वर्षात आलेली ही पहिली निवडणूक आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मतदान हाेत आहे. राजकीय वातावरण तापत असून गावपुढाऱ्यांनी आपले पॅनल तयार केले आहे. मात्र अद्यापही या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले नाही. अनेक डावपेच आखणे सुरू असून त्यातील एक डावपेच म्हणजे प्रतिस्पर्धी गटातील उमेदवाराला मागे घ्यायला लावणे, यासाठी विविध आमिषे दिली जात आहेत. दबावतंत्राचा वापरही केला जात आहे. जिल्हास्तरावरील राजकीय नेत्यांकडूनही यासाठी मनधरणी केली जात आहे. गटातटाच्या राजकारणात गावखेडे अडकले असून प्रत्येकाला या निवडणुकीत आपली अस्मिता दाखवायची संधी असते. त्यामुळेच ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
सर्वाधिक ग्रामपंचायतींची निवडणुक भंडारा तालुक्यातील असून ३५ ग्रामपंचायतींच्या १११ सदस्यांसाठी ही निवडणूक हाेत आहे. ७५८ उमेदवारांनी नामांकन दाखल केले हाेते. त्यापैकी ४ नामांकन छाननीत बाद झाले. आता ७५४ नामांकन कायम आहेत. साकाेली तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या १६० जागांसाठी ३३४ नामांकन, तमसर तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या १६० सदस्यांसाठी ४२५ नामांकन, लाखांदूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या ९९ सदस्यांसाठी २४४ नामांकन, माेहाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या १४१ सदस्यांसाठी ३९८ नामांकन, पवनी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या २१६ जागांसाठी ५३९ आणि लाखनी तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या १५६ जागांसाठी ४२४ नामांकन कायम आहेत. आता ४ जानेवारी राेजी या निवडणुकीचे चित्र स्पष्ट हाेणार आहे.
बाॅक्स
कुठे थेट तर कुठे तिहेरी लढतीची शक्यता
नामांकन मागे घेण्यासाठी कुणी कितीही मनधरणी केली तरीही ही निवडणूक गावाच्या आणि गटाच्या अस्मितेची असते. त्यामुळे कुणी माघार घेईल याची शक्यता तशी कमीच असते. त्यामुळे जिल्ह्यातील बहुताश ग्रामपंचायतीत थेट लढत तर काही ठिकाणी तिहेरी लढतीची शक्यता आहे. या निवडणुकीने गावात थेट दाेन गट निर्माण झाले असून अस्मितेची ही लढत संक्रांतीपर्यंत सुरू राहणार आहे.