भंडारा : खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यापूर्वी केंद्र सरकारने शेतमालाच्या खर्चावर आधारित हमीभाव तत्काळ जाहीर करावा, अशी मागणी अशी मागणी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी मोहाडी तालुकाध्यक्ष राजेश हटवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांव्दारे पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
केंद्र सरकारने दरवर्षी खरीप हंगामात पेरणीपूर्वी शेतमालाचे हमीभाव जाहीर केल्यानंतर शेतकरी बांधव खरिपाच्या पेरणीचे पूर्व नियोजन करून विविध भागातील शेतकरी धान,कापूस,सोयाबीन, तूर, ज्वारी,मका यासारख्या इतर पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. त्यामुळे केंद्र सरकारने पेरणीपूर्वी शेतमालाचे खर्चावर आधारित हमीभाव जाहीर करणे ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी आहे. परंतु पावसाळा ऋतूला सुरुवात झाली, तरीही केंद्र सरकारने शेतमालाचे हमीभाव जाहीर केले नाही. त्यामुळे या वर्षी पेरणीच्या हंगामात कोणत्या पिकाला चांगला दर मिळेल, याची माहिती शेतकरी बांधवांकडे नसल्याने शेतात कोणत्या पिकाच्या वाणाची पेरणी करावी, असा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे.
केंद्र सरकारने पेरणीपूर्वी शेतमालाचे खर्चावर आधारित हमीभाव जाहीर न केल्याने शेतकरी बांधवांच्या अडचणी वाढल्या असून ते त्रस्त झाले आहेत. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारच्या कृषी मूल्य आयोगाचे काम रेंगाळले असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. केंद्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी बांधवांना त्रास सहन करावा लागत आहे.