लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील पुरामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता संपूर्ण भंडारा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महासचिव अनुसूचित जाती विभाग मनोज बागडे यांच्या पुढाकारात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राहुल गांधी यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्ह्यात शेतीचे आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पवनी तालुक्यामध्ये कोंढा कोसरा, सोमनाळा, आपेट, चीचाळ, पातरी, सेंदरी, मोठी सेंदरी, भावळ, आसगाव, लहान सेंदरी, निरगोळी पेठ, वलनी, शिवनाळा, पालोरा, बाम्हणी, इत्यादी गावामध्ये व भंडारा तालुक्यातील नदीकाठच्या गावांतील घरांच्या नुकसानीपोटी ५ लाखांची आणि घरात पाणी शिरलेल्यांना एक लाखाची मदत देण्याची मागणी केली आहे. यासोबतच, शेतातील संपूर्ण धान्य व इतर पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये त्वरित देण्यात यावे, अतिवृष्टीमुळे चिखलमल झालेल्या भंडारा शहरातील रस्त्यांची त्वरित चौकशी लावून ते दुरुस्त करण्यात यावे व दोषींवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात आहे.
केंद्र सरकारने १ जुलैपासून जे नवीन लागू केले, त्यात कलम १०७ व कलम ११६ अंतर्गत होणाऱ्या गुन्ह्यांसंबंधात पूर्वीप्रमाणेच तालुका स्तरावरच निपटारा व्हावा, या गुन्ह्यातील प्रतिबंधात्मक कारवाईचे अधिकार पूर्वीप्रमाणेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडेच ठेवावे. प्रतिबंधात्मक कारवाईत जमानत घेणाऱ्यांना जिल्ह्यात तासन तास उभे राहावे लागते, त्यामुळे त्यांच्या मूलभूत अधिकाराचे हनन होत असल्याकडेही या निवेदनातून लक्ष वेधले आहे. राहुल गांधी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्र्यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना नाहिद खान, किशोर राऊत, इमरान पटेल, शेख नवाब पटेल, राजेश ठवकर, सय्यद अली, उमेश मोहतुरे, हिवराज कुंभारे, नरेंद्र साकुरे आदी उपस्थित होते.