कार्यकर्त्यांमध्ये उत्साह : भाविकांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानीभंडारा : अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विघ्नहर्ता, गणरायाचे गुरूवारी आगमन होत आहे. त्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी व त्याच्या आराधनेसाठी युवा तथा आबालवृध्दांमध्ये कमालीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. गणरायाच्या मुक्कामादरम्यान भक्तांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवाणी ठेवण्यात आली आहे. गुरुवारी गणरायाचे आगमन होत असल्याने शहरातील सर्व गणेशभक्त व मंडळ सज्ज झाली आहेत.तारणहार असे बिरूदावली मिरविलेल्या गणपतींचे गुरूवारी गणेशचतूर्थीला मोठ्या वाज्यावाज्यात आगमन होत आहे. अनंत चतुर्दशी म्हणजेच १० दिवस गणेशाची मोठ्या भक्तिभावाने दररोज पूजाअर्चा केल्या जाते. गणपतीच्या आगमनासाठी युवा वर्गाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शहरासह ग्रामीण भागातीलही गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी आपल्या लाडक्या गणरायासाठी आकर्षक मंडपाची उभारणी केली आहे. भंडारा शहरात ‘भंडाराचा राजा’ तर लगतच्या गणेशपूरात ‘गणेशपूरचा दाता’ अशा दोन गणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी योजना आखली आहे. १० दिवस लाडक्या गणेशाचा मुक्काम राहणार असल्याने भव्यदिव्य, आकर्षक मंडपाची उभारणी केली आहे. गणेशपूर येथील सन्मित्र गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणराया उत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांची मेजवाणी ठेवली आहे. गावातील मुख्य चौकात नेत्रदीपक मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. या चौकातून जाणाऱ्या प्रत्येकाला लाडक्या गणरायाचे दर्शन अगदी रस्त्यावरूनच व्हावे, अशा ठिकाणी गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. मंडपापासून ते राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा परिषद चौक अशा एक किलोमीटर परिसरात मंडळाने रोषणाई केली आहे. ही रोषणाई कलकत्ता येथील असून डोळ्याचे पारणे फेडणारी ही रोषणाई आबालवृध्द ते लहानग्यांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणारे असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष विनोद भुरे यांनी ‘लोकमत’ला दिली.गुरूवारी गणरायाचे आगमन होणार आहे. बुधवारी शहरातील सर्वच गणेश मंडळासह गणेशपुरातील गणेश मंडळाच्या पदाधिकारी व मंडळ उभारणी करणारे कारागीर उत्साहात काम करताना आढळून आले. बाप्पाचे आगमन सार्वजनिक ठिकाणी नसून, जणू तिथे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरीच होत असल्याची प्रचिती त्यांच्या काम करण्याच्या वृत्तीवरून दिसून येत होते. गणपतींचे आगमन होत असल्याची भावनाच अनेकांच्या मनात आनंदाची हुळहुळी भरवणारी आहे. (शहर प्रतिनिधी)
गणरायाच्या आगमनासाठी सजले जागोजागी मंडप
By admin | Published: September 17, 2015 12:30 AM