१५ लोक ०१ केअड्याळ : अड्याळ ग्रामपंचायत येथे पूर्ण वेळ ग्रामविकास अधिकारी नेमावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. परंतु एक महिन्याचा काळ लोटूनही ग्रामपंचायतीला नियमित ग्रामविकास अधिकारी लाभला नाही. वर्तमान स्थितीत ग्रामविकास अधिकारी एस. एम. मोहोड आहेत. हेसुद्धा ठरलेल्या दिवशी उपलब्ध होत नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामवासी व काही ग्रामपंचायत सदस्य तथा स्वरक्षण टीमच्या सदस्यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला माल्यार्पण करून रोष व्यक्त केला आहे.
माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार यांच्या नेतृत्वात गत महिन्यात अड्याळ ग्रामवासी तथा स्वरक्षण टीम तर्फे जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा यांना एक निवेदन देण्यात आले होते. त्यात जिल्ह्यात अड्याळ ग्रामपंचायतीचे नाव मोठ्या ठळक अक्षरात लिहिले जात असले तरी अवस्था मात्र बिकट आहे. हीच वास्तविक वस्तुस्थिती आहे. अड्याळ ग्रामपंचायतीला लाभलेले ग्रामविकास अधिकारी यांना दोन ग्रामपंचायतचा कारभार दिला आहे. या आधी असं नव्हते, ही बाब सत्य आहे.
अड्याळसारख्या मोठ्या ग्रामपंचायतमध्ये पूर्ण वेळ ग्रामविकास अधिकारी न देता तात्पुरता का देण्यात आला यातही मोठे राजकारण झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अड्याळ गावाला राजकारण्यांचा बालेकिल्ला म्हणतात! एव्हढे असले तरी खेदाची बाब म्हणजे दिव्याखाली आजही अंधार आहे. काही दिवसांआधी ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत अड्याळ ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड झाली होती. त्या दिवशीपासून तर आजपर्यंत ग्रामविकास अधिकारी हे अड्याळ ग्रामपंचायतला परतले नाही. त्यामुळे गावातील ग्रामस्थांचे कामेही वारंवार खोळंबली जात आहेत. याकडे जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.