वर्षाकाठी फक्त १६.५ लाखांची तरतूद : राजकीय इच्छाशक्तीचा अभावइंद्रपाल कटकवार भंडाराएखाद्या उद्यानात प्रवेश केल्यावर प्रथम आपले लक्ष आपसुकच लहानग्यांसाठी असलेल्या खेळण्याच्या साहित्यांकडे जाते. परंतु भंडारा नगर पालिकेच्या अखत्यारीतील उद्याने तेवढी नशीबवान नाहित. एकेकाळी हिरव्यागार असलेल्या उद्यानांची अधोगती झाली आहे. एक किंवा दोन उद्यानांची स्थिती बरी असली तरी अन्य बगिच्यांची स्थिती चिंताजनक आहे. निधीचा वाणवा, राजकिय इच्छाशक्तीचा अभाव व नागरिकांची उदासिनता ही प्रमुख कारणे यासाठी कारणीभूत आहेत.उद्याने कशी असावीत? असा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याचे उत्तर, ‘मन प्रसन्नचित्त करणारी असावीत’ असे येईल. परंतु भंडारा शहरातील उद्यानांची स्थिती विकासाऐवजी भकास झालेली आहे. राजीव गांधी चौक परिसराला लागुन असलेल्या नटवरलाल पटेल उद्यानाची (मिस्कीन टॅक) स्थिती बऱ्यापैकी आहे. शहीद स्मारकातील बगिच्याची स्थिती चांगली असली तरी त्यानंतर शहरातील बगिचे शेवटची घटका मोजत आहेत. मोठा बाजार परिसरातील शर्मा बालोद्यान, मेंढा परिसरातील चाचा नेहरू बालोद्यान, म्हाडा कॉलनीतील बालोद्यान, शिवाजी बालोद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील उद्यान, डॉ.तुरस्कर हॉस्पीटल समोरील उद्यान (आताचे नावापुरते क्रीडांगण), मुस्लिम लायब्ररी चौकातील उद्यान, भगतसिंग वॉर्डातील उद्यान यासह शहरातील अन्य उद्यानांची स्थिती विदारक आहे. एक घसरगुंडी सोडली तर येथे आपल्याला हिरवळ सुद्धा पाहायला मिळणार नाही. अतिक्रमणाची समस्या ही वेगळीच आहे. कर्मचाऱ्यांचा वाणवा ही एक मोठी समस्या बगिच्यांच्या देखभालीत आडकाठी ठरत आहे. वॉर्डात नीटनेटके उद्यान व्हावे असे कदाचित नागरीकांना वाटत नसावे. बगिच्यांमध्ये सौंदर्याचा लवलेशही नाही. पदाधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा म्हणावा की निधीचा ठणठणाट त्याचा परिणाम उद्यानांची स्थिती पाहुन लक्षात येतो. काही वर्षांपूर्वी नगर पालिकेच्या खर्चातून बगिच्यांची देखभाल करण्यात आली होती. आता मात्र हौशी लोकांचे पत्ते खेळण्याचे एकमात्र साधन उद्यान बनले आहे. भग्नावस्थेत असलेले प्रवेशद्वार, मुतारीची दुर्गंधी, वाळलेले गवत या देणग्या या बगिच्यांच्या भाग्यात लाभल्या आहेत. न.प.चे पदाधिकारी या बगिच्याच्या उद्धाराकडे नजर घालणार काय? अल्प निधीत विकास अशक्यशहरातील नगर पालिका प्रशासनाच्या अखत्यारीत येत असलेल्या उद्यानांच्या विकासासाठी व सौंदर्यीकरणासाठी पालिका प्रशासनाने वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये फक्त १६ लक्ष ५० हजारांची तरतूद केली आहे, निधी कसा खर्च होतो, कुठल्या कामावर खर्च होतो, हे बगिच्यांच्या अवस्थेवरून काही नव्याने सांगण्याची गरज उरलेली नाही. तुटपुंज्या रकमेत जवळपास दहा उद्यानांचा विकास होणार तरी कसा, हा मुख्य प्रश्न आहे.मुख्याधिकारी म्हणून शहराच्या सर्वांगिण विकासावर लक्ष केंद्रीत करण्याचे कार्य सुरू आहे. त्याअंतर्गत भविष्यकालीन नियोजनात सुनियोजित पद्धतीने उद्यानांचा विकासावर काम करण्याचा मानस आहे. त्या दिशेने लवकरच पाऊले उचलण्यात येईल. -अनिल अढागळे,मुख्याधिकारी, न.प. भंडारा.
हिरव्यागार उद्यानांची अधोगती
By admin | Published: August 03, 2016 12:23 AM