देव्हाडी येथील उड्डाणपुलात राखेचा भराव करण्यात आला होता. परंतु पावसाळ्यात उड्डाणपुलातून मोठ्या प्रमाणात राख बाहेर येत असल्याने पुलाच्या काही भागात पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी भरून काढण्यात आली. परंतु नियमितपणे राख पुलातून बाहेर निघत असल्याने संबंधित विभागाने तज्ज्ञांना पाचारण करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली येथील तज्ज्ञांचे पथक पाहणी करणार आहे. कोरोना संक्रमण काळात हे पथक आलेले नाही. परंतु लवकरच येथे पथक येणार असल्याची माहिती आहे. सदर पथकात राज्य शासनाचे मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांचा समावेश आहे. सुमारे २६ कोटीचा हा उड्डाणपूल असून राज्य शासन व रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर देव्हाडी येथील फाटकावर हा उड्डाणपूल तयार होत आहे. रेल्वेचे सध्या लोखंडी गर्डर लाँचिंगचे काम सुरू आहे. रेल्वेने रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला १८ मीटरचे १० गर्डर लाँचिंग केले आहे. त्यानंतर ३६ मीटरवरील रेल्वे ट्रॅकवर मुख्य गर्डरचे काम सुरू करणार आहे. दोन दिवसापूर्वी रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्यांनी येथे पाहणी केली. गर्डर लाँचिंगनंतर त्यावर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
दिल्लीचे पथक करणार देव्हाडी उड्डाणपुलाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:35 AM