सानगडी : शालेय विद्यार्थ्यांना शासनाने विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या सुरू केल्या आहेत. वर्ग ५ ते १० वीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, वर्ग ९ ते १० साठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती व आदिवासी शिष्यवृत्ती अशा अनेक योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासनाकडून लाभ दिला जातो. आपल्या विद्यालयातील कोणताही विद्यार्थी संबंधित शिष्यवृत्ती अनुदानाच्या लाभापासून वंचित राहू नये याची जबाबदारी पार पाडण्याची खबरदारी संबंधित मुख्याध्यापकांना घ्यावी लागत आहे. कोरोनाच्या दहशतीने शाळा बऱ्याच दिवस बंद राहिल्या. विद्यार्थी आणि शाळा यांचा संबंध दुरावला असल्याने मिळेल त्या माध्यमातून विद्यार्थी अथवा पालकांशी शिक्षक -मुख्याध्यापक यांनी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव तयार केले. भंडारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे प्रस्ताव भंडारा येथे स्वीकारले जात आहेत. जिल्हास्तरावर प्रस्ताव स्वीकारले जात असल्याने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना, लिपिकांना भंडारा येथे जावे लागत आहे. स्वीकारण्याचे टेबल कमी असल्याने संबंधितांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. हेच जर सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती स्वीकारण्याच्या धर्तीवर वेळापत्रकानुसार प्रत्येक तालुक्यात स्वीकारले गेले तर कोणालाही मन:स्ताप सहन करावा लागणार नाही. जिल्हास्तरावर प्रस्ताव स्वीकारण्याची पद्धत बंद करून प्रत्येक तालुक्यात संबंधित माध्यमिक शाळांचे प्रस्ताव स्वीकारण्यात यावेत. ७० ते ८० किलोमीटर अंतर तुडवून बऱ्याच लिपिक व मुख्याध्यापकांना जिल्ह्याच्या ठिकाणी प्रस्तावांचे ओझे वाहून न्यावे लागत आहे. हे अतिशय जिकिरीचे काम आहे. कधी कधी पहिल्या खेपेला स्वीकारले गेले नाही तर परत येऊन पुन्हा जावे लागत आहे. परिणामी शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हे काम जलदगतीने आणि सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेऊन तालुकास्तरावर प्रस्ताव स्वीकारण्याची सोय करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य भंडारा जिल्हा शिक्षक परिषद व मुख्याध्यापकांनी केली आहे.
शाळांमधील शिष्यवृत्त्यांचे प्रस्ताव तालुकास्तरावर स्वीकारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:06 AM