आंधळगाव : शासकीय अन्नधान्य व केरोसीन लाभार्थी कार्डधारकांना न देता काळाबाजार करीत असण्याची तक्रार आंधळगाव येथील ग्रामस्थांनी केली असून त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. आंधळगाव येथील राशन दुकानदार शालीक डेकाटे हे अन्नधान्य व रॉकेलचा काळाबाजार करतात. राशन कार्डावर स्वत:च गॅस कनेक्शन असल्याचा शिक्का मारणे, कार्डावरुन नाव कमी करणे, कार्डधारकांसोबत उर्मट वागणे अशी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली आहे. त्यांचा परवाना रद्द करुन चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मोहाडी तालुक्यात शालीक डेकाटे यांचे शासकीय स्वस्त धान्याची दुकान आहे. मात्र खऱ्या लाभार्थ्यांना अन्नधान्य व केरोसीन वितरण न करता त्याचा काळाबाजार केला जातो. कार्डधारकांना अन्नधान्य व केरोसीन दिले जात नाही. अनेकांकडे गॅस कनेक्शन नसूनही त्याच्या कार्डावर गॅस असल्याचा स्टॅप डेकाटे हेच मारतात. यामुळे खरे लाभार्थी शासकीय अन्नधान्यापासून वंचीत राहत आहे. शासनाने दिलेले अन्न धान्याचे वाटप आठ-दहा दिवसातच संपल्याचे सांगण्यात येते. उरलेले अन्नधान्य हे वाढीव दरात विकतात. कार्डधारकांना २ लीटर केरोसीन मिळत नाही. मात्र टॅक्टर मालकाना ३० रुपया भावात २५ ते ३० लीटरही मिळत असते. आंधळगाव येथील वॉर्ड क्र. ५ मधील संजय डहाके यांच्या कार्डवर डेकाअे यांनी स्वत:च गॅस कनेक्शन असल्याचा स्टॅप मारला व धान्य व केरोसीन देणे बंद केले. यामुळे मागील सहा महिन्यापासून डहाके हे अन्नधान्य व केरोसीन पाहून वंचीत आहेत. याबाबत विचारणा केली असता डेकाटे हे धमकावितात. अशा मनमानी करणाऱ्या राशन दुकानदाराचा परवाना रद्द करुन चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
‘त्या’ स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी
By admin | Published: February 08, 2017 1:44 AM