बाराभाटी : या परिसरातील जंगलाला लागून असलेल्या शेतातील मका, चना, उडीद अशा कडधान्याची रानडुकरांनी खूपच नासधूस केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून पाठपुरावा करण्यात आला. परंतु अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
ग्राम कवठा, बोळदे व डोंगरगाव या भागात शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकांचे रानडुकरांनी नुकसान केले आहे. जंगलालगत शेती असल्याने हा प्रकार नेहमीचे झाले आहे. मात्र यामुळे शेतकरी चांगलेच संकटात येतात. यंदाही तोच प्रकार घडला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रानडुकरांनी केलेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात कागदपत्र जमवून फाईल प्रादेशिक वनपरिक्षेत्राधिकारी (नवेगाव बांध) यांच्या कार्यालयात सादर केली आहे. पण अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. कोरोनामुळे नागरिकांच्या हाताला काम नाही. अशात उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे.
तरी नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी बाराभाटी, येरंडी-देवलगाव, डोंगरगाव, बोळदे, कवठा, कुंभीटोला व ब्राह्मणटोला या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
कोरोनामुळे निधी अप्राप्त आहे. निधी मिळताच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केला जाईल.
-रोशन दोनोडे, वनपरिक्षेत्राधिकारी, वनविभाग, नवेगाव बांध