सीलेगाव, पांजरा, रेंगेपार, चुल्हाड परिसरात धान पिकांचे नुकसान
तुमसर : खरीप हंगामासोबत रबी हंगामातही धान उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. तुमसर तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून, शेतातील उभे व कापलेले धान पिकाचे येथे मोठे नुकसान झाले आहे. कर्ज काढून शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली होती. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मागील चार दिवसांपूर्वी सिलेगाव, रेंगेपार, पांजरा, चुल्हाड, सिहोरा परिसरात अवकाळी पाऊस पडला. या परिसरात शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पीक मोठ्या प्रमाणात लावले आहे. सध्या धान पीक कापणीला आले असून, काही शेतकऱ्यांनी धान पिकाची कापणी केली आहे, तर काही शेतकऱ्यांचे धान शेतात उभे आहे. वादळी पावसात संपूर्ण धान पीक ओले झाले असून, कापलेले धान पीक पाण्यामध्ये सापडले आहे. धान कापणीला आल्याने त्याची कापणी कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतात सध्या पाणी साचले आहे. हाती आलेल्या पिकाला पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतीची महसूल प्रशासनाने पाहणी करून पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.
सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून रबी हंगामात धान पिकाची लागवड केली होती. अवकाळी पावसामुळे धानाचे मोठे नुकसान झाले, कर्ज कसे फेडावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याची भरपाई निघावी याकरिता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी हंगामात उन्हाळी धान पिकाची लागवड केली होती. या हंगामातही अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. त्यामुळे शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीही नागपुरे यांनी निवेदनातून केली आहे.