जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी रोजी पहाटे शिशू केअर केंद्रात आग लागून १७ नवजात बालकांपैकी दहा नवजात बालकांना जागीच आपला नाहक जीव गमवावा लागला होता. यामध्ये लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ येथे बेवारस मिळालेल्या तीन दिवसांच्या बालकाला लाखनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले होते. मात्र या घडलेल्या दुर्घटनेमुळे त्या बालकाला न्याय मिळू शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यात अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी झालेल्या अग्निकांड घटनेची सखोल तात्काळ चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. जनकल्याण समाजोन्नती अन्याय निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष दिनेश वासनिक, रोशन फुले, एस. एस. बोरकर, राहुल राऊत, चारुल रामटेके, अंबादास नागदेवे, राजेश वाघमोडे, महेंद्र देशपांडे, नाना गायधने, प्यारेलाल कटलेट, किशोर मेश्रम यांनी निवेदना दिले आहे. दहा बालकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद न केल्यास संपूर्ण राज्यभर जनकल्याण समाजोन्नती अन्याय निवारण समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष दिनेश वासनिक यांनी निवेदनातून दिला आहे.
नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:30 AM