भंडारा : तालुक्यातील सिल्ली येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाला तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सिल्ली येथील शेतकरी अशोक साखरकर (५०) यांनी नापिकी व कर्जबाजारीमुळे कंटाळून शेतावर जाऊन थिमेट प्राशन करून आत्महत्या केली. अशोक साखरकर यांच्यावर सेवा सहकारी संस्था, सिल्लीचे व नातेवाईक व गावकऱ्यांचे अंदाजे ५० हजार रूपये कर्ज आहे. त्यांची मागणी ते वारंवार करीत होते. परंतु त्यांच्या शेतीत खरीप हंगामात झालेल्या नापिकीमुळे व रब्बी हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे पुर्णत: नुकसान झाले आहे. खरीप हंगामात झालेल्या धानाला भाव नसल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते.अशोक साखरकर यांच्या कुटूंबात पत्नी व दोन मुले असा परिवार असून कुटूंबातील कमावता व्यक्ती मरण पावल्यामुळे आपल्या कुटूंबाचे उदरनिर्वाह कसे होईल, असा प्रश्न त्यांच्या परिवारात उभा राहला आहे.भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, धनंजय दलाल, तालुका अध्यक्ष नरेंद्र झंझाड, ईश्वर कळंबे यांनी सात्वन भेट दिली. तसेच आत्महत्याग्रस्त कुटूंबास तात्काळ आर्थिक मदत द्यावी, असे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांनी दिले. शिष्टमंडळात गुणवंत काळबांडे, ज्योती सुनील टेंभुर्णे, अनंतकुमार बोदेले, विनोद साठवणे, श्रीकांत गभणे, संजय लांजेवार आदी कार्यकर्ते हजर होते. (नगर प्रतिनिधी)
शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी
By admin | Published: May 25, 2015 12:37 AM