जांब(लोहारा) : पाटबंधारे विभाग भंडारा अंतर्गत येत असलेल्या हिवरा प्रकल्पाच्या हिवरा व नवेगाव रिठी नहराचे खोदकाम ऐन शेतीच्या हंगामात, मनमानी प्रकाराने सुरू आहे. परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नहराचे खोदकाम करीत असल्याची तक्रार परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. शेती वर व नहराचे खोदकाम खोल करीत असल्याने जवळच्या शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा होणार नाही. उलट शेतातील पाणी नहरात जाईल पण नहराचे पाणी शेतात येणार नाही.
शेतात जाण्याचा मार्ग तोडून टाकला आहे. त्यामुळे शेतात मशागतीसाठी ट्रॅक्टर व इतर साहित्य नेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शेती पडीक राहण्याची वेळ आली आहे. नहर खोदकामासाठी शेतकऱ्यांच्या शेतातून पोकलेन मशीन नेल्याने शेतकऱ्यांचे बांध फुटले आहेत. त्यामुळे शेतीची रोवणी कशी करावी, अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन हिवरा व नवेगाव नहराच्या खोदकामाची चौकशी करण्याची मागणी हिवरा ग्रामवासीयांनी केली आहे.