जवाहरनगर : केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कोविड-१९ प्रादुर्भावादरम्यान सामूहिक क्षेत्रातील कंपन्या, कारखाने येथे अस्तित्वात असलेल्या संख्येपेक्षा निम्म्या कामगारांद्वारे काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र आयुध निर्माणी, भंडारा येथे कामगारांची उपस्थिती जवळजवळ शंभर टक्के असल्याचे कामगार संघटनांच्या निदर्शनास आले. त्यानुसार कमी संख्येवर आयुध निर्माणी येथे काम करण्यात यावे, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना इंटक युनियनतर्फे देण्यात आले.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य सरकारने औद्योगिक कारखान्यांमध्ये बाहेरून ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनाई केली. औद्योगिक क्षेत्र ५०-५० टक्क्यांवर, तर सरकारी कार्यालये १५ टक्के कर्मचारी संख्याबळावर चालविण्याचे दिशानिर्देश सरकारकडून देण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्याचे प्रयत्न सरकार करीत आहे. परंतु आयुध निर्माणी, भंडारा, जवाहरनगरमध्ये आजच्या परिस्थितीत एकूण स्थायी कर्मींचे संख्याबळ २२०० पेक्षा जास्त असून सरकारच्या दिशानिर्देशानुसार १००० पेक्षा जास्त कर्मी अशा कोरोना परिस्थितीत निर्माणीत एकत्र येतात. त्यात कंत्राटी मजुरांची पण अधिक भर पड़त आहे.
येथील कारखान्यात कामाचा प्रकार सामूहिक व रसायनांचा असून काम झाल्यावर सर्व कर्मचारी आपल्या विश्राम / चेंजिग रूममध्ये एकत्र येतात. परिणामी संक्रमणाचा जास्त प्रसार होण्याची चिन्हे दिसत आहेत. आतापर्यंत निर्माणी परिसरातमध्ये ५५० पेक्षा जास्त लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले असून, आतापर्यंत आठ कर्मचारी मृत्युमुखी पडलेले आहेत. परिसरातील लोकांमध्ये भीतीचे दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. दरम्यान ‘न्यू एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी वर्कर्स युनियन,’ भंडारा यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनात नमूद केले की, सरकारी कार्यालयाप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातही १५ टक्क्यांवर चालविण्यात यावे. कोरोना संक्रमनाची साखळी तोडण्यास मदत होईल. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांना युनियनचे महासचिव चंद्रशील नागदेवे, कार्यकारी अध्यक्ष विकास बावनकुळे, नाना जेठे, उमाकांत तिवारी, मोटघरे गुरुजी, रंजित बागडे, कुलदीप खोब्रागडे, एकनाथ कुंजेवार, सुशील बागडे, सरोज चकोले, इ. यांनी दिले.