मागील एक वर्षापासून कोरोना आजाराने थैमान घातले आहे. यापूर्वी या भागात कोरोनाचे प्रमाण कमी होते. परंतु दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाने रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन करून औषध उपचार करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र गंभीर रुग्णासाठी शहापूर परिसरात कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे भंडारा, नागपूर या ठिकाणी मोफत उपचारासाठी पाठविले जाते. परंतु त्या ठिकाणी बेड उपलब्ध राहत नसल्यामुळे कोरोना रुग्णांची फारच गैरसोय होते. परिणामी, गंभीर रुग्णांना प्रसंगी जीव गमविण्याची वेळ येते. यासाठी शहापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनसह कमीतकमी २५ खाटांची व्यवस्था करून तत्काळ कोविड केंद्र तयार करून देण्यात यावे, अशी मागणी सरपंच मोरेश्वर गजभिये यांनी केली आहे.
शहापूर आरोग्य केंद्रात ऑक्सिजन व खाटांची व्यवस्था करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:36 AM