आमगाव येथे सुरू असलेल्या नळ योजनेला पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने ती पाण्याची टाकी व पाइपलाइन निर्लेखित करून नव्याने पाण्याची टाकी बांधण्यात आली तसेच गावांमध्ये नव्याने पाइपलाइन घालण्यात आली. या योजनेला करंचखेडा येथून वैनगंगा नदीचे पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र रोज नळाला पाणी येत नाही तसेच गावातील कुटुंबे वाढल्यामुळे गावाची लोकसंख्या वाढली. मात्र त्या प्रमाणात या योजनेच्या पाणीपुरवठा करण्यासाठी टाकी वाढविण्यात आली नसल्याने नळाला पाणी मिळाले पाहिजे त्या प्रमाणात पाणी येत नाही. अशी ओरड गावकरी करीत आहेत. या योजनेवर लाखो रुपये खर्च करण्यात आले असून गावकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात फायदा होताना दिसत नाही. नळाला पाणी नियमित येत नसल्याने गावातील अनेक कुटुंबांनी आपल्या स्वतःची बोरवेल तयार करण्याचे धोरण आखले असून अनेकांनी आपल्या घरी बोरवेल तयार केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विहीर व बोरवेलमधील पाण्याची पातळी खालावत असते. त्यामुळे बोरवेललासुद्धा पाहिजे त्या प्रमाणात पाणी येत नसल्याने या योजनेचा पाणीपुरवठा नियमित सुरळीत सुरू ठेवण्याची मागणी आमगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
आमगाव येथील नळाला नियमित पाणीपुरवठ्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:33 AM