गत वर्षीपासून कोविड रुग्ण दगावल्यानंतर गिरोला येथे निर्माण करण्यात आलेल्या स्मशानभूमीत मृतदेहांना अंत्यसंस्कारासाठी आणले जाते. वीस ते बावीस मृतदेह एकाच दिवशी आणले जातात. त्यामध्ये काही मृतदेह अर्धवट स्थितीत जळतात. त्या मृतदेहांचे उरलेले अवशेष गावातील मोकाट कुत्री गावात आणत असल्याचे वास्तव समोर आले आहे. स्मशानभूमी गावालगतच असल्यामुळे दुर्गंधी येत आहे. त्यामुळे गावात संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. अगोदरच गावात १०२ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. चारजणांचा मृत्यूसुद्धा झाला आहे. परिणामी गिरोला येथे असलेली स्मशानभूमी अन्य निर्जन स्थानावर स्थलांतरित करण्यात यावी, अशी मागणी भिलेवाडा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कोविड स्मशानभूमी अन्यत्र हलविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:32 AM