कोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत रस्ता १५६ गावांचा समावेश होतो, येथे दोन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर असून ९ उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत.
सध्या कोंढा येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे तसेच उपकेंद्रातदेखील वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. सध्या या आरोग्य केंद्र अंतर्गत रस्ता येणाऱ्या गावात ताप, खोकला, अंगदुखी असे प्रमाण वाढते आहे. ते सर्व रुग्ण कोंढा येथील आरोग्य केंद्रात ॲन्टिजेन टेस्ट करण्यासाठी येत असल्याने दररोज कोविड रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दररोज कोंढा आरोग्य केंद्रात ५० ते ६० रुग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने त्यांना घरीच आयसोलेशन राहण्याचे सांगितले जाते आहे. अनेकांच्या घरी स्वतंत्र खोली उपलब्ध नाही, त्यामुळे संसर्ग अधिक वाढण्याचा धोका आहे. सध्या घरोघरी रुग्ण आहे. अनेक कोरोना पॉझिटिव्ह नागरिक रस्त्याने फिरताना दिसतात. तेव्हा कोंढा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्वतंत्र कोविड रुग्णालय प्रशासनाने सुरू करणे गरजेचे आहे. कोंढा हे मध्यवर्ती ठिकाण असून पवनी तालुकापासून १२ किमी आहे. पवनी व परिसरातील रुग्ण यासाठी सिंदपुरी येथे रुग्णालय उभारले आहे. तसेच रुग्णालय कोंढा येथे उभारल्यास परिसरातील रुग्णास मोठा आधार मिळणार आहे. दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रत्येक नागरिकांना मोठी धास्ती निर्माण झाली आहे. कोंढा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व इतर पदे भरून कोंढा येथे कोविड रुग्णासाठी तात्पुरते केंद्र उभे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.