पालांदूर :
जिल्ह्यात कोरोनाचे संकट कमी झाले आहे. जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात आहे. यामुळे एक ते सातचे वर्ग नियमित सुरू करण्याची मागणी पालक वर्गाकडून होत आहे. शाळा बंद असल्याने लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गत दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने अभ्यासाची सवय तुटत आहे. मुले शिक्षणापासून दूर जात आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात बरीच मुलं नदी, नाल्यांकडे फिरण्याच्या बहाण्याने जात असल्याने धोका वाढला आहे. शाळा सुरू झाल्यास शाळेत विद्यार्थी सुरक्षित राहतात; मात्र शाळा बंद असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्षण विभागाने लक्ष देऊन वास्तव परिस्थिती लक्षात घेत स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने शाळा सुरू करायला हरकत नसावी, असा सूर पालकांतून निघत आहे. स्मार्टफोनच्या नादात विद्यार्थ्यांना मोबाईलचे अतोनात वेड लागले आहे. टी.व्ही (दूरदर्शन) अर्थात टेलिव्हिजन नाही तर फोनलाच विद्यार्थ्यांची पसंती आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे. प्रायमरीचे विद्यार्थी तर शिक्षणापासून दूर राहत असल्याने नेहमीचा अभ्यासही विसरलेले आहेत. अशा परिस्थितीत शाळा सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. वर्ग आठ ते बारा शाळा सुरूच आहेत. त्यांचाच मागोवा घेत प्राथमिक व माध्यमिक शाळा सुद्धा सुरू कराव्यात. जेणेकरून विद्यार्थ्यांना विद्यार्जनाकरिता शैक्षणिक वातावरण मिळेल. पालकांची चिंता कमी होऊन सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यात मोठी मदत होईल. कोरोनाच्या नियमात शाळा सुरू करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
बॉक्स
शासन निर्णयाकडे लक्ष
काही गावात तत्पर शिक्षणप्रेमी शिक्षकांनी पालकांच्या परवानगीने शाळा सुरू केल्या आहेत. मात्र अधिकारी वर्गाकडून रीतसर परवानगी नसल्याने कारवाईचे भय कायम आहे. सणासुदीत शाळा बंद असल्याने मुलांचे शाळेकडे दुर्लक्ष होत आहे. शासन स्तरावरून किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अजूनपर्यंत तरी शाळा सुरू करण्याचे निर्देश मिळालेले नाहीत. जोपर्यंत शाळा सुरू करण्याचे आदेश येणार नाही. तोपर्यंत शाळा सुरू करता येणार नाही अशी माहिती जिल्हा परिषद भंडाराचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर यांनी दिली.
कोट
ग्रामीण भागात कोरोनाचे बिलकुल भय राहिलेले नाही. पोरं दिवसभर खेळतात. पावसाचे दिवस असल्याने ओले होत सर्दी खोकल्याचा त्रास ओढवून घेतात. शिस्त राहिलेली नाही. पालकांचे मुले ऐकत नाही. शिक्षकांचा धाक व शैक्षणिक वातावरण बालवयात अत्यंत महत्त्वाचे आहे.
कांचन राठोड, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, पालांदूर.