पवनी : कोरोना संकटाचा सामना करीत एक वर्ष उलटले. वर्षभरात शासनाने तालुका स्तरावरील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी नियोजन केलेले नाही. कोरोना संकटावर मात करण्यासाठी तालुका स्तरावर आरोग्य यंत्रणा बळकट करावी, अशी गरज निर्माण झाली आहे.
ग्रामीण रुग्णालय पवनीमार्फत सिंदपुरी (रुयाळ) येथील कोरोना सेंटरवर कोरोनाबाधित रुग्णावर उपचार केले जात आहेत. उपचारासाठी दर दिवसाला रुग्णसंख्येत वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येनुसार मनुष्यबळ, ऑक्सिजन साठा आणि रेमडेसिविर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, तालुकास्तरावरील आरोग्य यंत्रणेकडे शासनाचे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष नाही. ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी फक्त तीन वैद्यकीय अधिकारी आहेत उर्वरित सर्व डॉक्टर अस्थायी स्वरूपाचे आहेत त्यामुळे त्यांची खाजगी प्रॅक्टिसकडे विशेष लक्ष असते.
सिंदपुरी (रुयाळ) येथील कोरोना सेंटरवर कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. उपचार घेत असलेल्या पन्नास ते साठ रुग्णांपैकी एका वेळी सात ते आठ रुग्णांना ऑक्सिजन देण्याची सोय आहे. ट्रॉली आणि ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता असल्याने त्यापेक्षा जास्त रुग्णांना ऑक्सिजन दिल्या जाऊ शकत नाही. गंभीर रुग्णांना वेंटिलेटरची गरज भासते; पण ती सुविधा ग्रामीण रुग्णालय किंवा कोरोना केंद्रावर नाही. जिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना कोरोना केंद्रावर मृत्यूचा सामना करावा लागत आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नाही. तसेच शववाहिनी व अंत्यसंस्कार करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण रुग्णालय व कोरोना केंद्रावरील या मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची रास्त अपेक्षा आहे.