लोकमत न्यूज नेटवर्क सावरला : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावरला वनक्षेत्रातील चन्नेवाडा बीटमध्ये राखीव वनाचे सीमांकन करण्यात आले. तसेच धानोरी राउंड रोपणमध्ये खड्डे खोदकाम करण्यात आले.
दरवर्षी तापमानामध्ये होणाऱ्या वाढीमुळे एकीकडे जनता त्रस्त असून, दुसरीकडे विविध कारणांसाठी वनाची मोठ्या प्रमाणामध्ये तोड केली जाते. परिणामता उष्णतेत वाढ होऊन भूगर्भामध्ये पाणी न साचता जमीन ओसाड होत चालली आहे. वनाचे प्रमाण कमी होत असल्यामुळे वन्यप्राणीसुद्धा अधिवासाअभावी अन्न व पाणी शोधण्यासाठी गावाकडे येताना दिसून येतात. त्यामुळे भविष्याचा वेध घेता वनाची लागवड करणे काळाची गरज आहे, अन्यथा भविष्यात जीवजंतूंचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही.
ही गरज लक्षात घेऊन पवनी वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राखीव वनांचे सीमांकन केले व येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची लागवड करून पर्यावरण जोपासण्याची शपथ पर्यावरण दिवशी घेण्यात आली. यामध्ये पवनी वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. के. नागदेवे, सावरला क्षेत्रसहायक आय. एच. काटेखाये, चन्नेवाडा बीटरक्षक एम. एस. मंजलवाड, सावरला बीटरक्षक भोगे, धानोरी बिटरक्षक ए. पी. झंझाड, बिटरक्षक एस. आर. घुसिंगे व वनमजूर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.