पालांदूर : शेतकऱ्यांना पारंपरिक ज्ञानात नवीन कृषी ज्ञान देत उत्पन्न व दर्जा सुधारण्यासाठी तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी हातात फावडे व कुदळ घेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. हा अनोखा प्रकार चूलबंद खोऱ्यातील वाकल येथे अनुभवास मिळाला. कृषी अधिकारी व त्यांची संपूर्ण टीम शेतकऱ्याच्या बांधावर उपस्थित होती. ५३ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवित मिरची उत्पन्नाचा नवा ध्यास स्वीकारला.
चूलबंद खोऱ्यात वर्षभर विविध पिके घेतली जातात. सदाबहार पालांदूर परिसरात भाजीपाला उत्पादित केला जातो. मात्र बाजारपेठेचे भाव अस्थिर होत असल्याने शेतकरी नैराश्यात जातो. याकरिता बाजारपेठेचे ज्ञान व ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना नव्या कृषी तंत्राचा अवलंब करून जेमतेम खर्चात अधिक नफ्याचे पीक घेण्याकरिता कृषी अधिकारी सरसावलेले आहेत. पीक निघाल्यानंतर बाजारात नगदी पिकांना मागणी कमी झाल्यास त्यावर प्रक्रिया करून विक्रीचे नियोजन कसे करावे. याकरिता शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन बचत गटाच्या मार्फत गावात रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकतो.
वाकल हे चूलबंद नदी तीरावरील सुपीक जमिनीचे गाव आहे. यातील बरेच नागरिक परंपरेनुसार कसारी (केसोरी) अर्थात बोट मिरची पिकाचे उत्पादन घेत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या हप्तापासून रोपवाटिकेची व्यवस्था केली जाते. त्या रोपवाटिकेत स्वतः तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी हातात कुदळ, फावडा घेत शेतकऱ्यांना रोपवाटिकेच्या व्यवस्थापनाविषयी प्रबोधन केले. यात मातीचे थर, शेणखत, बियाणे यांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या घरचे बियाणे प्रक्रिया करून गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार करण्याच्या अनुषंगाने नव्या तंत्राचा अभ्यास दिला. नव्या प्रात्यक्षिकाने शेतकरीसुद्धा भारावले. यावेळी त्यांच्यासोबत मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, कृषी पर्यवेक्षक अशोक जिभकाटे, कृषी सहायक वैशाली खांदाडे, सचिन झंझाड, उपस्थित होते. शेतकरी वर्गात सरपंच टिकाराम तरारे, पोलीसपाटील आनंदराव बोरकर, यशवंत साखरे, नरेश चिमलकर, रामाजी बावणे, उषा साखरे, पुनाजी नंदर्धने, जनार्दन भुसारी, शालिक बावणे, शालिक मेश्राम, मधुकर साखरे, योगेश नंदरधने तसेच महिला समूहाच्या वर्धिनी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
कोट
निरोगी, सुदृढ रोपाकरिता गादीवाफ्यावर रोपवाटिकेचे नियोजन महत्त्वाचे आहे. त्याकरिता बीजप्रक्रिया गरजेची आहे. मररोग टाळण्याकरिता पेरणीपूर्वी चा उपाय खूप महत्त्वाचा आहे. शेतकरी मेहनती असून नव्या अभ्यासाची गरज आहे. केसोरी अर्थात बोट मिरची करिता शेतकरी उत्साही आहेत. हिरव्या, लाल मिरचीला बऱ्यापैकी मागणी असते. हिरव्या मिरचीला भाव नसल्यास ती लाल करून विकू शकतो. भाव पडल्यास साठवण करून ठेवू शकतो. प्रसंगी पावडर करून सुद्धा विकू शकतो. बागायतदारांना रोपवाटिकेचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन करण्यात आले. मंडळ कृषी कार्यालयाची संपूर्ण टीमचे शेतकऱ्यांना निमित्त मार्गदर्शन मिळणार आहे.
किशोर पात्रीकर, तालुका कृषी अधिकारी, लाखनी
कोट
कृषी अधिकाऱ्यांच्या टीमने आम्हा शेतकऱ्यांना दिलेले मार्गदर्शन निश्चित प्रेरणादायी आहे. ५३ मिरची उत्पादक बागातदार एकत्रित येऊन अधिक उत्पादन व दर्जेदार पिकाकरिता प्रयत्न करू.
टिकाराम तरारे, सरपंच, वाकल