सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते. जिल्ह्यात मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकाच्या काढणीवेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन बियाणे भिजले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घरच्या घरी बियाण्याची आधी उगवणक्षमता तपासावी. बाजारात सद्य:स्थितीत सोयाबीनचे भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडे खरीप हंगामातील राखून ठेवलेल्या घरातीलच सोयाबीन बियाण्यांचा वापर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करावा. कोरोनाचा फटका सर्व व्यवसायांना बसल्याने महागाईत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल व उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे दोन वर्ष पेरणीसाठी वापरू शकतात. सोयाबीन बियाणे अत्यंत नाजूक असते, त्याचे बाह्य आवरण पातळ असल्याने त्याची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनातच बीज प्रक्रिया करावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसल्याची खात्री करावी. बियाण्याची घरी साठवणूक करताना प्लास्टिक पोत्यांचा वापर टाळावा
बॉक्स
शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी या गोष्टी कराव्यात
रायझोबियम व पीएसबी या जीवाणू संवर्धकाची प्रत्येकी दोनशे ते अडीचशे ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून असे बियाणे सावलीत वाळवावे पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी बियाण्याची पेरणी पुुरेशा ओलीवर आणि तीन ते चार सेंटिमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी. प्रतिहेक्टरी ७० किलोवरून ५० ते ५५ किलो आणण्यासाठी सोयाबीन बियाणे टोकण पद्धतीने किंवा प्लांटरच्या साह्याने रुंद वरंबा सरी पद्धत बीबीएफ यंत्राने पेरणी करावी. यासाठी पेरणीपूर्व सोयाबीन उगवण क्षमता तपासून बीजप्रक्रिया करूनच बियाण्याची पेरणी करावी.
कोट
कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सोयाबीन उगवण क्षमतेची गावोगावी प्रात्यक्षिके घेण्यात येत असून, शेतकऱ्यांनी आपल्याजवळीलच बियाणे वापरावे. मात्र, पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्याची घरच्या घरी उगवण क्षमता तपासावी. ७० टक्क्यांपेक्षा जास्त उगवण क्षमता असणारे बियाणे बीजप्रक्रिया करूनच वापरावे. यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे.
शांतीलाल गायधने, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा