भंडारा : डेंग्यूचा प्रसार हा एडिस इजिप्टाय डासाच्या मादीमार्फत होते. जुलै हा कालावधी डेंग्यूकरिता संक्रमण कालावधी असतो. जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने किटकजन्य आजाराची संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार गावपातळीपर्यंत योग्य त्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी उपाययोजना सर्तकतेने राबविणे गरजेचे आहे. डेंग्यू नियंत्रण लोकचळवळ व्हावी, असे मत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अदिती त्याडी यांनी केले.
मोहिमेच्या आनुषंगाने पूर्वतयारी पारेषण काळापूर्वी करणे गरजेचे आहे. डेंग्यूची लागण होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यू रोगजंतूचे निदान करून रुग्णांच्या शरीरातील उपचाराने संपूर्ण रोगजंतू नष्ट करणे. रोगाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे गरजेचे आहे.
गावातील व गावाबाहेरील खतांच्या खड्ड्यामध्ये मॅलेथिऑन पावडर ग्रामपंचायतमार्फत खरेदीकरून डस्टिंग करणे गरजेचे आहे. शौचालयाच्या पाइपला जाळी बसविणे. ग्रामीण भागात पाणी साठविण्याची हौद, रांजण व माठ यामध्ये पाणी साठवून ठेवले जाते. पाणी वाया जाईल या भीतीने त्यात वरचेवर पाणी टाकले जाते. या पाण्यामध्ये डेंग्यू प्रसारक एडिस इजिप्टाय नावाच्या डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे डेंग्यू व चिकणगुनिया तापाचा उद्रेक उद्भवू शकतो. म्हणून पाणी साठविण्याचे भांडे रांजण, हौद, कूलर आठवड्यातून एकदा घासून पुसून कोरडे व स्वच्छ करावे.
संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीचा कार्यक्रम आखून दिलेले असून कोणतेही घर गृहभेटीविना राहणार नाही, याची दक्षता घेतली जाते. डेंग्यू प्रतिरोध जनजागरण मोहिमेत स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग अत्यंत मोलाचा आहे. डेंग्यू नियंत्रण ही एक लोकचळवळ व्हावी याकरिता सर्वांचे मोलाचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अदिती त्याडी यांनी केले आहे.