कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून वाहतूक बंद : मध्यप्रदेश शासनाची कारवाई
तुमसर: कोरोनाचे संक्रमण आपल्या राज्यात वाढू नये त्याची खबरदारी घेत मध्यप्रदेश शासनाने देवनारा ते बडपाणी आंतरराज्य पुलावर लाकडे आडवी करून बंद केला आहे. तुमसर तालुक्यातील आदिवासीबहुल चिखली, देवनारा या गावांना जोडणारा हा दुसरा आंतरराज्य पूल आहे. या पुलाचे बांधकाम मध्यप्रदेश शासनाने केले होते.
तुमसर तालुक्यातील आदिवासीबहुल चिखली, देवनारा परिसरातून मध्यप्रदेशातील बडपाणी मेहकेपार या गावांना जोडणारा हा एकमेव आंतरराज्य पूल असून मध्यप्रदेश शासनाने या पुलाचे बांधकाम केले आहे. आपल्या राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढू नये याची खबरदारी घेत मध्यप्रदेश शासनाने या पुलाच्या पोहोच मार्गावर मोठी लाकडांची ओंडकी आडवी करून हा पूल वाहतुकीकरिता काही दिवसांपूर्वी बंद केला. महाराष्ट्रात कोरोनाची गती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण मध्यप्रदेश राज्यातील सीमावर्ती भागात वाढू नये याकरिता ही खबरदारी घेतली गेल्याची माहिती आहे.
बडपाणी येथील सरपंच यांनी मध्यप्रदेश शासनाकडे व मेहके पार पोलिसांकडे पुलावरून वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने मेहकेपार पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन हा पूल वाहतुकीकरिता लाकडे आडवे करून बंद केला.
चिखली देवनारा या परिसरातील नागरिकांचे मध्यप्रदेशातील नागरिकांशी नातेसंबंध आहेत. बावनथडी नदी ओलांडल्यानंतर मध्यप्रदेशची सीमा सुरू होते. त्यामुळे या नागरिकांचे जाणे-येणे बंद झाले आहे.
नाकाडोंगरी पूल वाहतुकीकरिता मोकळा: तुमसर कटंगी आंतरराज्य मार्गावर नाकाडोंगरी येथे बावनथडी नदीवर पूल आहे. हा पूल मागील आठ महिन्यांपासून बंद होता.
सदर पूल नादुरुस्त असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरून वाहतूक बंद केली होती. खा. प्रफुल्ल पटेल, आ. राजू कारेमोरे यांच्या मध्यस्थीने या पुलावरून चार दिवसांपूर्वी हलक्या वाहनांकरिता वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
भंडारा जिल्हा प्रशासनाने मध्यप्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून देवनारा बडपाणी आंतरराज्य पूल वाहतुकीकरिता खुला करण्यात यावा याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी मागणी तुमसर तालुक्यातील आदिवासीबहुल परिसरातील नागरिकांनी केली आहे.